Heat wave : मे महिन्यात ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट; विदर्भ-मराठवाड्याचाही समावेश | पुढारी

Heat wave : मे महिन्यात ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट; विदर्भ-मराठवाड्याचाही समावेश

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मे महिन्यात देशाच्या काही भागांमध्ये सलग ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भा-मराठवाड्याचाही समावेश आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार राज्यातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरात या भागांमध्ये ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार, दरवर्षी मे महिन्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात ३ दिवस उष्णतेची लाट असायची. पण मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट ५ ते ७ दिवस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याचे महासंचालक एम. महापात्रा यांनी माहिती दिली की, “मे महिन्यात सरासरी तीन दिवस उष्णतेची लाट असते. परंतु यावर्षी उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या जास्त असू शकते.”

हवामान खात्यानुसार, दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरात भागात मे महिन्यात सुमारे ८ ते ११ दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्य, उत्तर-पश्चिम, मध्य भारत आणि उत्तर-पूर्व द्वीपकल्पीयच्या लगतचा भाग वगळता देशाच्या बहुतेक भागांमध्ये कमाल तापमानाची शक्यता आहे.

मे महिन्यामध्ये ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

उष्णतेच्या लाटेसोबतच मे महिन्यात काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ओडिशा, उत्तर छत्तीसगड, झारखंड, दक्षिण पश्चिम बंगाल, ईशान्येकडील काही भाग, आंध्र प्रदेश आणि केरळमधील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button