सहा इंचांच्या शेपटीसह मुलीचा जन्म! | पुढारी

सहा इंचांच्या शेपटीसह मुलीचा जन्म!

मेक्सिको सिटी ः कधी कधी काही बाळांमध्ये जन्मतःच शेपटीसारखा भाग असल्याचे दिसून येते. आता मेक्सिकोमध्येही अशाच एका बाळाने जन्म घेतला आहे. तेथील एका चिमुकलीला जन्मताच सहा सेंटीमीटरची शेपूट असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आता तिची ही शेपूट शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली आहे. या चिमुकलीचा जन्म ईशान्य मेक्सिकोमधील एका ग्रामीण रुग्णालयात झाला.

तिला जन्मतःच शेपूट होती. ही शेपूट 5.7 सेंटीमीटर लांब व 3 ते 4 मि.मी. रुंद होती. या शेपटीला थोडे थोडे केसदेखील होते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी’ मध्ये या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. चिमुकलीची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. तिच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये कोणताही संसर्ग आणि रेडिएशनचा इतिहास नाही. त्यांना आधीही एक मुलगा झाला होता. मात्र, तो सर्वसामान्य व स्वस्थ आहे.

मात्र, मुलीचा जन्मतःच शेपूट असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. शेपटी आढळल्यानंतर मुलीची तपासणी करण्यात आली. तेव्हा तो केवळ मांसाचा गोळा असल्याचे समोर आले. तिथे एकही हाड नव्हते. शेपटी मऊ होती, त्वचेने झाकलेली होती आणि त्यावर हलके केस होते. शेपटी हलवल्यानंतर कोणतीही वेदना होत नव्हती, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे. सर्व चाचण्या केल्यानंतर एका छोट्याशा ऑपरेशननंतर मुलीच्या शरीरातून शेपटी काढून टाकण्यात आली. तसेच, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर मुलीची प्रकृती स्थिर असून अद्याप कोणतीही समस्या आली नाही.

Back to top button