नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार | पुढारी

नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोग्य विभागानेही या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शोधलेल्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त इतर वितरित केलेल्या प्रमाणपत्रांचीही तपासणी आरोग्य विभागाने तयार केलेली समिती करणार आहे.

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची शासनाच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आरोग्य संचालकांनी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांच्या सूचनेनुसार चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत गेल्या एक ते दोन वर्षांत वैद्यकीय प्रमाणपत्रांची छाननी केली जाणार आहे. या अहवालात काेणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी व जिल्हा रुग्णालयातील लिपिक किशोर पगारे यांच्याकडून प्रमाणपत्रांचे सर्व रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी समितीस दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. २०) हे रेकॉर्ड ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या जिल्हा रुग्णालयातील दोन तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही मंगळवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ महिला लिपिक व जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन या दोघांना अटक केलेली आहे.

हेही वाचा:

Back to top button