सहाव्या टप्प्यात 59 टक्के मतदान | पुढारी

सहाव्या टप्प्यात 59 टक्के मतदान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 8 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात (जम्मू आणि काश्मीर) मिळून सरासरी 58.82 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त 78.79 टक्के मतदान पश्चिम बंगाल येथे, तर सर्वात कमी 51.41 टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले.

दरम्यान, पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक, तर तिसर्‍या टप्प्यात आसाममध्ये सर्वाधिक मतदान झाले होते. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातही पश्चिम बंगालने आघाडी कायम राखली आहे. देशात 18 व्या लोकसभेसाठी मतदानाचा सहावा टप्पा शनिवारी पार पडला. यामध्ये लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान झाले. या 58 जागांमध्ये बिहार 8, हरियाणा 10, झारखंड 4, ओडिशा 6, उत्तर प्रदेश 14, पश्चिम बंगाल 8, दिल्ली 7, जम्मू-काश्मीर 1 अशा एकूण 58 जागांचा समावेश आहे.

मतदानाच्या टक्केवारीत बदल होऊ शकतो, असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्या सगळ्यांची एकूण माहिती येण्यास उशीर होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले.  18 व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 428 लोकसभा जागांवर मतदान आधीच पूर्ण झाले आहे.

32 वर्षांनी मतदान : काश्मिरी हिंदू अनंतनागमधील काश्मिरी हिंदू वीर सराफ यांनी सांगितले की, मी 32 वर्षांनंतर पहिल्यांदा काश्मीरमध्ये मतदान केले आहे. गत दहा वर्षांतील बदलांमुळेच हे शक्य झाले.

बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक

पश्चिम बंगालमधील झारग्राममधील भाजपचे उमेदवार प्रणंत तुडू यांच्या ताफ्यावर गडबेटामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. तुडू यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. भाजपने तृणमूलवर आरोप केला आहे.

इंडिया आघाडीला 300 वर जागा : येचुरी

सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मतदानानंतर, इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मत व्यक्त केले.

मान्यवरांचा मतदानात सहभाग

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केले. 95 वर्षांच्या वडिलांसोबत मी मतदान केले. हा माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे, असे ते म्हणाले. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी दिल्लीत मतदान केले. निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू यांनी कुटुंबासह मतदान केले. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये मतदान केले

पंतप्रधानांचे 4 भाषांतून आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिया, बंगाली, इंग्रजी आणि हिंदी या 4 भाषांतून सोशल मीडियावरून लोकांना मतदानाचे आवाहन केले.

मतदानाची टक्केवारी

  • दिल्ली : 53.73
  • बिहार : 52.24
  • हरियाणा : 55.93
  • झारखंड : 61.41
  • ओडिशा : 59.60
  • उत्तर प्रदेश : 52.02
  • पश्चिम बंगाल : 78.79
  • जम्मू-काश्मीर : 51.41

Back to top button