टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ न्यूयॉर्कला रवाना | पुढारी

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ न्यूयॉर्कला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाची पहिली तुकडी शनिवारी रात्री न्यूयॉर्कला रवाना झाली. रोहितसोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही मुंबई विमानतळावर दिसले. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह सपोर्ट स्टाफचे सदस्यही पहिल्या तुकडीसह रवाना झाले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात टीमचे सदस्य मुंबई विमानतळावर दिसत आहेत. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी-20 विश्वचषकातील मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा समावेश गट-अ मध्ये आहे. ज्यामध्ये सह-यजमान अमेरिका, कॅनडा आणि पाकिस्तान संघाचा समावेश आहे.

न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. भारतीय संघाने या जागतिक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये शुभमन गिल, रिंकु सिंग, खलील अहमद आणि आवेश खान राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे.

सॅमसन-चहल दुसऱ्या बॅचमध्ये होणार रवाना

संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि यशस्वी जैस्वाल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दुसऱ्या तुकडीसह रवाना होतील. हे चार खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा भाग असलेला रिंकू सिंग अंतिम सामन्यानंतर दुसऱ्या गटासह बाहेर न्ययॉर्कसाठी रवाना होणार आहे. केकेआर संघ आयपीएलच्या चालू हंगामाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून त्यांना सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.

कधी होणार हार्दिक संघात सामील?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, T20 वर्ल्ड कपमध्ये टीमचा उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या काही दिवस लंडनमध्ये प्रशिक्षण घेणार असून तेथून तो थेट संघात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हार्दिक संघात कधी सामील होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार

T-20 विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने सुरू होण्यापूर्वी भारत एकमेव सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ 1 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्याच दिवशी डॅलस येथे होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात कॅनडाचा सामना सह-यजमान अमेरिकेशी होणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

Back to top button