अब की बार… कोण जिंकणार? | पुढारी

अब की बार... कोण जिंकणार?

चेन्नई; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या पर्वाचा विजेता कोण, याचे उत्तर आज मिळणार आहे. चेन्नईत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये आयपीएल 2024 चा अंतिम सामना रंगणार आहे. कोलकाताने आतापर्यंत दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे तर सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंत एकदाही चषक जिंकता आलेला नाही; परंतु या संघाची आधीची फ्रँचाईजी डेक्कन चार्जस संघाने एकवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने या सत्रात पहिल्यापासून धडाकेबाज कामगिरी केली. त्यांनी या सत्रात फक्त तीन सामने हरले आहेत. गुणतालिकेत अव्वल स्थानावर त्यांचा सातत्याने कब्जा होता. त्याच थाटात ते फायनलमध्ये गेले.

गौतम गंभीर याने संघाचा मेंटॉर म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून संघाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. आतापर्यंत कर्णधार म्हणून गंभीरने दोन वेळा केकेआरला चॅम्पियन बनवले. 2014 आणि 2016 अशी दोनदा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केकेआरने केले आहे. आता मेंटॉर म्हणून तो ट्रॉफी जिंकून देतो का ते पाहावे लागेल.

सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर होता, पण क्वालिफायर-1 मध्ये ते पराभूत झाल्यामुळे त्यांना क्वालिफायर-2 खेळून फायनलमध्ये प्रवेश मिळवावा लागला. सनराझर्स हैदराबाद संघाची मालकी मारन ग्रुपकडे गेल्यानंतर त्यांनी ट्रॉफी जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु त्यांचे हे स्वप्न यंदा पॅट कमिन्स पूर्ण करेल, अशी त्यांना आशा आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार आहे.

फिरकीचे वर्चस्व राहणार?

चेन्नईतच शुक्रवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा पराभव केला, त्यात शाहबाझ अहमद आणि अभिषेक शर्मा या दोघांनी मिळून पाच विकेटस् मिळवल्या. अभिषेकने तर या स्पर्धेत पहिल्यांदा गोलंदाजी केली. कोलकाताकडे जादूगार सुनील नारायण आणि मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती हे दोन फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे या फिरकीपटूंचे वर्चस्व अपेक्षित आहे.

ग्राऊंड रिपोर्ट : रात्रीच्या वेळी पडणारे दव हे चेपॉक स्टेडियमवर एक रहस्य बनले आहे. शुक्रवारच्या सामन्यात दव पडले नव्हते. त्यामुळे हैदराबादच्या फिरकी गोेलंदाजांना चेंडूवर ग्रीप मिळवणे सोपे झाले. आजही त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतील. रविवारच्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

यांच्यावर असेल लक्ष :

कोलकाता नाईट रायडर्स : कोलकता संघातील प्रत्येक खेळाडू सामना जिंकून देऊ शकतो; परंतु सध्या फॉर्मात असलेला सुनील नारायण, आंद्रे रसेल, व्यंकटेश आणि श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती हे प्रमुख मॅचविनर आहेत. त्यानंतर रिंकू सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती सामन्याला निर्णायक कलाटणी देण्याची क्षमता बाळगून आहेत.

सनराझर्स हैदराबाद : हैदराबाद संघाने यंदाच्या स्पर्धेत तर कमाल केलेली आहे. तीन सामन्यांत अडीचशे पार धावा करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची बॅट धावांची त्सुनामी आणणारी आहे. त्यानंतर स्वतः कर्णधार पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, शाहबाझ अहमद, हेन्रिक क्लासेन, एडेन मार्करम आणि आता राहुल त्रिपाठी हैदराबादला दुसर्‍यांदा विजेतेपद मिळवून देण्यास सक्षम आहेत.

Back to top button