नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी | पुढारी

नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या फेब्रुवारीत होणार्‍या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुढील महिन्यापासून अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून, त्यात नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

नाशिकसह पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत 2 फेब—ुवारी 2023 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या पाचही ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणजे मतदार नोंदणी असून, येत्या 1 ऑक्टोबरपासून त्यासाठीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, यंदाच्यावर्षी मतदार नोंदणी करताना त्यात आयोगाने काहीसे बदल केले आहेत. त्यामुळे या बदलाच्या माहितीसह अन्य तयारीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत.

पदवीधरसाठी जिल्हाभरातून गेल्या वर्षीपेक्षा अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने पुढील महिन्यापासून अधिकार्‍यांचे प्रशिक्षण घेण्याची तयारी केली आहे. प्रशिक्षणवर्गात मतदार नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

इच्छुकही लागले कामाला
पदवीधर मतदारसंघासाठी प्रशासकीय स्तरावर मतदार नोंदणीसाठी हालचाली गतिमान होत असताना विभागातील पाचही जिल्ह्यांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. इच्छुकांकडून मागील मतदारांशी संपर्क साधत त्यांना नोंदणीसाठी आर्जव केले जात आहे. तसेच गाठीभेटीवर इच्छुक लक्ष केंद्रित करत आहेत.

मतदार नोंदणी कार्यक्रम
1 ऑक्टोबर : नोंदणीबाबत जाहीर अधिसूचना प्रसिद्धी
15 ऑक्टोबर : नोंदणीबाबत नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी
25 ऑक्टोबर : नोंदणीबाबत नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी
23 नोव्हेंबर : प्रारूप यादीची प्रसिद्धी
23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर : दावे-हरकतींसाठीची मुदत
25 डिसेंबर : दावे-हरकती निकाली काढणे
30 डिसेंबर : अंतिम मतदारयादी प्रसिद्धी

हेही वाचा :

Back to top button