सातारा : आरळे येथील तिहेरी अपघातात युवक ठार | पुढारी

सातारा : आरळे येथील तिहेरी अपघातात युवक ठार

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकी व एक चारचाकी कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात गंभीर जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे (वय 25, रा. पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार दि. 20 रोजी सायंकाळी आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत घडली असून अपघातात एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील केतन लेंभे व जय उत्तम भोईटे (वय 22 आदर्की बुद्रुक ता. फलटण) हे दोघे शनिवारी सकाळी कामानिमित्त सातारा येथे आले होते. त्यानंतर माघारी जाताना आरळे येथे आल्यानंतर चारचाकी कार व आणखी एका दुचाकीचा अपघात झाला. कार तेथे न थांबता ती निघून गेली. मात्र दोन दुचाकींचा भीषण अपघात होवून केतन व जय जखमी झाले.

केतन याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना केतन याचा मृत्यू झाला. केतन लेंभे हा अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी पूर्ण करुन पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. गावी आल्यानंतर ही घटना घडली. केतनच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. केतन याच्या वडीलांचे निधन झाले आहे. एकुलता एक असणार्‍या केतनच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button