ठाणे, कल्याणचे सुभेदार कोण? भिवंडीत कमळ विरुद्ध तुतारी, अपक्ष तिरंगी लढत | पुढारी

ठाणे, कल्याणचे सुभेदार कोण? भिवंडीत कमळ विरुद्ध तुतारी, अपक्ष तिरंगी लढत

ठाणे : दिलीप शिंदे : शिवसेनेच्या उठावाचे मुख्य केंद्र असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील लढतीचे चित्र आज महाराष्ट्र दिनी स्पष्ट झाले आहे. भाजपचे वर्चस्व मोडीत काढून शिवसेना शिंदे गटाने दोन जागा पदरात पाडून घेत ठाणे लोकसभेसाठी माजी महापौर नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभेतील हॅट्ट्रिक साधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे या दोन मित्रांमध्ये ठाणेदारी मिळविण्यासाठी थेट लढत होईल. कल्याणची सुभेदारी मिळविण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर हे आमने-सामने असून भिवंडीत भाजपचे कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात तिरंगी लढत होईल.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावरून महायुतीमध्ये खडाजंगी सुरु होती. दावे -प्रतिदावे सुरु असताना आपआपली ताकदीचे प्रदर्शन करीत जास्तीत जास्त जागा मिळविण्याचे प्रयन्त सुरु होते. त्या वादातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या जागांचा निर्णय प्रलंबित होता. त्यात भाजपने या जागांवर दावे ठोकून त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी जोरात प्रचार यंत्रणा राबवून शिवसैनिकांवर दवाब आणला होता. विरोधी उमेदवारांनी प्रचार सुरु केला तरी कोण कुठल्या जागा लढविणार यावर चर्चेचे गुर्‍हाळ सुरु होते. या पार्श्वभूमीवर ’ठाण्याच्या उमेदवारीचा मे महिन्याचा मुहूर्त’ या आशयाचे वृत्त दैनिक पुढारीने 21 एप्रिलरोजी प्रसिद्ध केले होते. ते वृत्त खरे ठरले आणि महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना ठाण्याचा उमेदवारी जाहीर करीत भाजपाला झटका दिला आहे.

ठाणे लोकसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात थेट लढत होईल. दोघेही मित्र असून दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य असून त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. मात्र म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटू लागले असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय युवा नेता राहुल लोंढे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उभारले. कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसर्‍यांदा उमेदवारी अर्ज दाखल करीत असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.

ठाणे – कल्याणमध्ये थेट लढत असताना भिवंडीत तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी रिंगणात उतरविले असून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निलेश सांबरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंग भरले आहेत. या तिरंगी लढतीचा फायदा कोण उचलतो, यावर भिवंडीच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत.

शिवसेना शिंदे गटाला 15 जागा

महायुतीमध्ये 48 पैकी 28 जागा ह्या भाजप लढविणार असून शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि रासपा एक अशा जागा लढविणार आहेत. शिंदे गटाला अपेक्षित जागा मिळाल्या असल्या तरी पालघरची जागा भाजपाला सोडावी लागली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असतानाही ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन जागांपैकी दोन जागा शिवसेना आणि एक जागा भाजप लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिंदे-म्हस्के यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

ठाणे आणि कल्याण लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी तातडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदे – म्हस्के यांनी आशीर्वाद घेतले आणि पाठिंबा मागितला. त्यांच्यासोबत कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक होते.

Back to top button