कर्नाटक, तेलंगणा देशाला दिशादर्शक : शरद पवार | पुढारी

कर्नाटक, तेलंगणा देशाला दिशादर्शक : शरद पवार

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये केवळ आश्वासनांची खैरात करून आणि विरोधकांवर टीका करून नेस्तनाबूत करण्याचा उद्योग मांडलेल्या भाजप सरकारची वाटचाल लोकशाही संपवून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. याउलट कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी चांगल्या योजना राबवत सत्तेच्या माध्यमातून देशाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर बुधवारी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. प्रा. सुभाष जोशी होते. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री डी. सुधाकर, गुजरातचे आ. जिग्नेश मेवाणी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये चांगले काम करणार्‍या अरविंद केजरीवाल यांनाही साम, दाम, दंड आणि भेद वापरून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अडचणीत आणून जनतेला विनाकारण वेठीस धरले जात आहे.

तरुणांना नोकर्‍या देतो, अशा भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तरुणांची शक्ती विघातक बाबीकडे वळवली आहे. हे देशाला घातक आहे. याउलट कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने जनतेसाठी गॅरंटी योजना यशस्वी राबवून आश्वासनांची पूर्तता केली आहे. ही दोन्ही राज्ये देशाला दिशादर्शक आहेत, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी मंत्री डी. सुधाकर, अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, राहुल जारकीहोळी, शुभांगी जोशी, धनश्री पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, अनिता पठाडे, शांता सावंत उपस्थित होते.

Back to top button