लग्नाच्या ३ वर्षानंतर बालविवाह झाल्याचे उघड, आरोपींवर गुन्हा नोंद | पुढारी

लग्नाच्या ३ वर्षानंतर बालविवाह झाल्याचे उघड, आरोपींवर गुन्हा नोंद

चारठाणा, पुढारी प्रतिनिधी: अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाणा हद्दीतील गिरगाव बीटमधील पाच जनांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.३१ मार्च) गुन्हा नोंद झाला आहे. लग्न झाल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरगाव बुद्रुक येथील ग्रामसेवक दीपक घुंगरे यांनी कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गिरगाव बुद्रुक येथील एका सतरा वर्ष पाच महिने वय असलेल्या अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील 31 मे 2021 रोजी गिरगाव बुद्रुक येथील शेत शिवारात बळीराम शंकर फाटे यांच्यासोबत लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर ती पीडिता तिच्या सासरी नवऱ्यासोबत राहत होती. विशेष म्हणजे चौकशीअंती तीन वर्षानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीमध्ये पीडीतेचा पती बळीराम शंकर फाटे, त्याचे वडील शंकर नानासाहेब फाटे आणि आई शारदा शंकर फाटे हे सर्व (रा.गिरगाव-बुद्रुक) तसेच मुलीचे वडील पुंजाराम गोडगे, मुलीची आई मंगल पुंजाराम गोंडगे (रा.नाशिक) आदी पाच जनांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गिरगाव बीटचे बीट जमदार दत्ता भदर्गे यांनी या प्रकरणात मोलाचे सहकार्य केले. अद्याप संशयितांवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. बालविवाह झाल्याची वाचा फुटल्यानंतर व बालविवाह झाल्याबाबतची चौकशी झाल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर या प्रकरणी दिनांक 30 एप्रिल मंगळवारी सायंकाळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कराड हे तपास करीत आहे.

Back to top button