कृत्रिम पानांपासून बनवले स्वच्छ इंधन | पुढारी

कृत्रिम पानांपासून बनवले स्वच्छ इंधन

लंडन : इंग्लंडमधील केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पाण्यावर तरंगणारी ‘कृत्रिम पाने’ बनवली आहेत. ही पाने सूर्यप्रकाश व पाण्याचा वापर करून स्वच्छ म्हणजेच पर्यावरणाला पूरक असे इंधन तयार करतात. वनस्पती सूर्यप्रकाशात ‘प्रकाश संश्लेषणा’ची क्रिया करून अन्न बनवत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन हे अतिशय पातळ व लवचिक उपकरण बनवण्यात आले आहे.

कॅम नदीत या उपकरणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. वनस्पतींची पाने जसे सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करतात तशाच प्रकारे हे उपकरण सूर्यप्रकाशाचे इंधनात रुपांतर करते. या शोधामुळे भविष्यात शिपिंग इंडस्ट्रीमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर कमी होऊ शकेल अशी आशा संशोधकांना आहे. पाण्यावर स्वच्छ इंधन तयार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ही कृत्रिम पाने कोणत्याही प्रकारच्या पाण्यात वापरता येऊ शकतात.

अगदी प्रदूषित पाण्यापासून ते समुद्रातील किंवा बंदरातील पाण्यातही ते वापरता येईल. त्यामुळे जागतिक जहाज व्यवसायाला जीवाश्म इंधनावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील प्रा. आयर्विन रेस्नर यांनी आपल्या सहकार्‍यांसह याबाबतीत गेल्या अनेक वर्षे संशोधन केले आहे. 2019 मध्येही त्यांनी एक उपकरण केले होते, पण ते जाडीला अधिक होते.

Back to top button