धुळ्याच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार | पुढारी

धुळ्याच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार

 धुळे : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ही स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेल्या शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे. त्यामुळे धुळ्यातील कट्टर शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आज धुळे जिल्हा शिवसेनेने जाहीर केले. पक्षातून कोणीही बाहेर गेले तरीही शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकत ठेवण्यासाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडल्याची स्थिती स्पष्ट दिसत आहे. या राजकीय बदलामुळे राजकारणात तसेच शिवसेनेच्या अंतर्गत संघटनांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. मात्र धुळ्याच्या शिवसैनिकांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच असल्याची घोषणा केली.

धुळ्यात शिवसेना भवनापासून महाराणा प्रताप पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे ,जिल्हा संघटक सुशिल महाजन, धीरज पाटील, कैलास मराठे, संदीप सूर्यवंशी ,कैलास पाटील, ललित माळी, महादू गवळी, भरत मोरे, जवाहर पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हातात घेऊन ही पदयात्रा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ गेल्यानंतर याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. यात बंडखोरी करणाऱ्या आमदारांविरोधात देखील रोष व्यक्त करण्यात आला.

शिवसेना ही स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर विचारांवर उभी आहे. शिवसेनाप्रमुखांनी सामान्य कार्यकर्त्यांना पद व शक्ती देउन उभे केले. यातूनच शिवसेनेचे मोठे संघटना उभे राहिले. सामान्य शिवसैनिक आज देखील भगव्याच्या सोबतच आहे. आज पक्षाच्या माध्यमातून मोठे झालेले काही आमदार शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला सामान्य शिवसैनिकांच्या नजरेत कवडीची देखील किंमत नाही. सत्तेसाठी इतर पक्षाकडून पैसा आणि यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करूनही फोडाफोडी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button