

संगमनेर: रस्ता ओलांडणार्या बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील चंदनापुरी घाट पायथ्याशी सोमवारी दुपारी घडली. दुपारी पुण्याकडून नाशिककडे जाणार्या चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. संगमनेरच्या चंदनापुरी घाटात दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडताना चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. यात चारचाकी वाहनाच्या बोनेटला बिबट्या अडकला होता.
मात्र, वाहन चालकाने प्रसंगावधान राखत चार चाकी वाहन मागे-पुढे घेतल्यामुळे बिबट्याला जीवदान मिळाले. बिबट्याच्या पाठीचे मोठ्या प्रमाणात सालपटे निघाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. गाडीच्या बोनेटमधून निघताच जखमी बिबट्याने जोराची धूम ठोकली. संगमनेरच्या पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आनंदवाडी शिवारात हा अपघात झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, अज्ञात वाहन चालकाचा वनविभागाकडून शोध सुरू आहे.