… आणि जखमी रुद्रांशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री | पुढारी

... आणि जखमी रुद्रांशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली आज (दि.५) किसननगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला.

शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली. रॅली सुरू असतानाच एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने जात असताना मुख्यमंत्र्यांना दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.

रुद्रांश रोनीत चौधरी (वय ९) असे मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकरांना पुन्हा एकदा पहायला मिळाली.

हेही वाचा :

Back to top button