वर्धा : शेतातील मोटारपंप चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा; सिंदी (रेल्वे) पोलिसांची कारवाई | पुढारी

वर्धा : शेतातील मोटारपंप चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा; सिंदी (रेल्वे) पोलिसांची कारवाई

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या नारायणपूर शिवारातील शेतातील मोटरपंप चोरीप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. पोलिसांनी गणेश बंडू भोयर (वय ३० रा. कळमना तालुका समुद्रपूर जि.वर्धा) व शंकर दिवाकर मुडे (वय २७ रा. मारडा तालुका समुद्रपूर जि. वर्धा) या दोघांना अटक केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सुनील राजेंद्र अवचट (रा. कांढळी) यांची नारायणपूर शिवारात शेती आहे. शनिवारी (दि. ४) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या विहिरीतील ओलितासाठी लावलेला मोटरपंप चोरून नेली. याप्रकरणी अवचट यांनी सिंदी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सिंदी पोलिसांनी तपासाला गती देत मिळालेल्या माहितीच्या आधारे गणेश बंडू भोयर व शंकर दिवाकर मुडे या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसी हिसका दाखवताच चोरी केलेली मोटरपंप सिंदी शहरातील भंगार विक्रेत्यास विकल्याची कबुली दिली. त्यामुळे भंगार विक्रेत्याच्या दुकानातून ५ एच.पीची १० हजार ५०० रुपये किमतीची मोटर तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरीतील दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मागदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर सुर्यवंशी, पोलीस हवालदार आंनद भस्मे, रवि मोरे, कांचन चाफले, उमेश खामनकार, शिवाणी निकम यांनी केली.

Back to top button