बीड : लाच घेताना ‘सार्वजनिक बांधकाम’चे कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात | पुढारी

बीड : लाच घेताना 'सार्वजनिक बांधकाम'चे कार्यकारी अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा :
विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणारा कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील या कार्यकारी अभियंत्याला ३० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अंबाजोगाई कार्यालयात एसीबीच्या पथकाने  आज (दि.२२) दुपारी केली. संजयकुमार कोकणे असे लाच घेताना रंगेहाथ  पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. या कारवाईने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.

संजयकुमार कोकणे गेल्या काही महिन्यांपासून अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली हाेती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती.या तक्रारीची नोंद घेत, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

सापळा रचून  एसीबी पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, पदभार स्वीकारताच त्यांनी कार्यालयात गुत्तेदार पिस्तुलचा धाक दाखवून बिलांवर सह्या घेतात, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणानंतर कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारे कोकणे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली हाेती.

हेही वाचा :

Back to top button