नाशिकला साडेपाच महिन्यांत 290 आगीच्या घटना, ‘या’ कारणांमुळे लागतेय आग | पुढारी

नाशिकला साडेपाच महिन्यांत 290 आगीच्या घटना, 'या' कारणांमुळे लागतेय आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
1 जानेवारी ते 15 जून या कालावधीत शहरात 290 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या ठिकाणी अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे जीवित किंवा वित्त हानी टळण्यास मदत झाली. दरम्यान, सर्वाधिक आगीच्या घटना कचरा किंवा मोकळ्या जागेवरील वाळलेल्या गवतास लागल्याचे आढळून आले आहे.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलामार्फत आग विझविली जात असते. हा विभाग 24 तास सतर्क असल्याने आगीची घटना कळताच विभागाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी रवाना होऊन आगीवर पाण्याचा फवारा मारून आग विझवित असतात. त्यानुसार विभागाने 1 जानेवारी ते 15 जून या कालावधीत 290 ठिकाणी पाण्याचे बंब व जवान पाठवून आग विझविली आहे. त्यात 249 आगीच्या घटना या लहान किंवा किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यात सर्वाधिक घटना कचर्‍यास आग लागल्याच्या होत्या. त्यानंतर 23 घटना मध्यम आगीच्या स्वरूपात होत्या. त्यात पडीक घरास, वाहनास किंवा निवास- व्यावसायिक ठिकाणी आग लागल्या आहेत. त्याचप्रमाणे 18 ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या असून त्यात वाहनांना, घरांना, दुकाने, कंपन्या या ठिकाणी आग लागल्या आहेत. आगीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळेस शहराबाहेर दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, ओझर या भागांमध्येही आग विझविण्यासाठी जवानांसह पाण्याचे बंब पाठविण्यात आले आहे.

आगीची कारणे 

वाळलेले गवत, कचरा यात ज्वलनशील पदार्थ असल्याने.
वाद-विवादातून लावलेली आग (वाहनांना)
पुरेशी खेळती हवा नसल्याने आग लागणे
शॉर्ट सर्किट

शहरात काही ठिकाणी कचरा साचवून ठेवला जात असतो. त्यात ज्वलनशील पदार्थ, ई-कचरा असल्याने उन्हामुळे किंवा पेटत्या सिगारेटमुळे इतर कारणांनी आग लागल्याचे आढळून आले आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक आगीच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे डोंगरावरील गवतासही आग लागत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे.

कालावधी व आगीचे स्वरुप 

महिना              लहान               मध्यम            मोठी
जानेवारी            19                      01               00
फेब—ुवारी           36                      01                02
मार्च                  54                      10                02
एप्रिल                77                      05                 05
मे                      54                      05                 04
15 जूनपर्यंत       09                       01                05
एकूण                 249                     23                 18

हेही वाचा :

Back to top button