राहुल हातोले
पिंपरी : वाहन चालविताना एखाद्यावेळी ब्रेक यंत्रणा नादुरुस्त झाली तरी आता नो टेन्शन ! लाईट आणि बझरमुळे ब्रेक फेल झाल्याची माहिती वाहन चालकाला मिळेल आणि गाडीची आपत्कालीन ब्रेक यंत्रणा कार्यरत होईल. त्यामुळे अपघात टळू शकेल. ही किमया केली आहे पिंपरी-चिंचवड शहरातील सुनील चाफळकर या प्राध्यापकाने त्यांनी इलेक्ट्रो हायड्रो ल्युमॅटिक ब्रेकिंग यंत्रणेचा शोध लावला आहे.
वाहनाची ब्रेक यंत्रणा नादुरुस्त झाल्यास लाईट आणि बझरद्वारे चालकास ब्रेक यंत्रणा नादुरुस्त झाल्याचा संकेत मिळेल. लगेच आपत्कालीन बे्रक यंत्रणा कार्यरत होऊन वाहन आपोआप थांबेल. या संशोधनाचे चाफळकर यांना पेटंट मिळाले आहे. या शोधाची इंडिया बुक्स रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
प्रा. चाफळकर यांचे 25 शोधनिबंध जगभरातील प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच सॉलिड फर्टिलायझर, स्प्रेडिंग मशिन आदींसह एकूण 12 पेटंट प्रकाशित झाले आहेत. प्रा. चाफळकर हे पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना नव्यानेच मिळालेल्या पेटंटचा मुख्य उद्देश प्राथमिक ब्रेकिंग यंत्रणेतील समस्या ओळखणे आणि गरजेनुसार वाहनावर स्वयंचलितपणे ब्रेक लागू करणे हा आहे. याद्वारे चालकास ब्रेक यंत्रणा नादुरुस्त झाल्याचे संकेत मिळतात, जेणेकरून वाहन थांबविण्यासाठी स्वयंचलित ब्रेक यंत्रणा कार्यरत होईल. त्यामुळे वाहन आपोआप थांबवले जाईल.
ब्रेक यंत्रणा नादुरुस्त झाल्याने दुर्घटना घडल्याची संख्या प्रचंड आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असल्याने यावर उपाय शोधण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. या प्रयत्नास यश मिळाल्याने आनंद होत आहे.
-प्रा. सुनील चाफळकर पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज, आकुर्डी
हेही वाचा