नाशिक : शिवसेना म्हणजे शिवसैनिकांचा श्वास- माजी मंत्री घोलप | पुढारी

नाशिक : शिवसेना म्हणजे शिवसैनिकांचा श्वास- माजी मंत्री घोलप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना हा केवळ पक्ष नसून शिवसैनिकांचा मंत्र, ध्यास, आत्मविश्वास आणि श्वास असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री बबन घोलप यांनी केले. शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन महानगर आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात यानिमित्त 56 किलो लाडूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी गटनेते विलास शिंदे, युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, शिवसेना विधानसभा प्रमुख नीलेश कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, महिला आघाडी संपर्क वि. से. संघटक संगीता खोडाना, महिला पदाधिकारी मंगला भास्कर, मंदा दातीर, शोभा मगर, शोभा गटकळ, माजी नगरसेवक राहुल दिवे, संतोष गायकवाड, प्रवीण तिदमे, चंद्रकांत खाडे, मधुकर जाधव, संगीता जाधव, राधा बेंडकोळी आदी उपस्थित होते.

प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. 19 जून 1966 ला हा पक्ष अस्तित्वात आला. राजकारणापासून दूर असूनही सामान्यांपासून ते राजकारणी, सेलिबि—टी, खेळाडू, उद्योजक, कलाकारांवर बाळासाहेबांचे गारूड होते. जनसामान्यांची नस ओळखणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती, असे सुनील बागूल यांनी सांगितले. करंजकर म्हणाले की, शिवसेनेची पाळेमुळे राज्याच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचली आहेत. बाळासाहेबांचा वारसा त्यांचे पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत आहेत. तर बडगुजर म्हणाले, शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. त्यामुळे राज्यातील आगामी मनपा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकहाती शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा संकल्प सर्व शिवसैनिकांनी केला तरच वर्धापन दिन साजरा केल्यासारखे होईल.

हेही वाचा :

Back to top button