Dhule : पिंपळनेरला वादळी वाऱ्यासह पाऊस ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान | पुढारी

Dhule : पिंपळनेरला वादळी वाऱ्यासह पाऊस ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. चिकसे, जिरापूर शिवारातील शेडनेट, कांदा चाळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन तासांच्या पावसातच नदी, नाले, पाटचाऱ्याचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने भाजीपाला पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चिकसे येथील घनश्याम कदम यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शासकीय अनुदानासह २१ लाख रुपये खर्च करून शेडनेट उभारले होते. मात्र, त्यात पीक घेण्यापूर्वीच वादळामुळे शेडनेट भुईसपाट झाले. त्यानंतर कांदाचाळीवर झाड कोसळून तीनशे क्विंटल कांदा पाण्यात भिजला. त्यामुळे कदम यांचे अंदाजे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच विनायक कुलकर्णी या शेतकऱ्याचे दीड एकरावरील शेडनेट वादळामुळे जमीनदोस्त झाले आहे. यामध्ये वांगी पिकाची काढणीची सुरवात होणार होती. चिकसे, देशशिरवाडे शिवारातील वैभव कदम व राहुल कदम यांचे तीन एकरावरील शेडनेट जमीनदोस्त झाले आहे. त्यामध्ये शिमला मिरचीचे नुकसान झाले आहे. मधुकर आघाव यांच्या कांदा चाळीवरील पत्रे उडून गेल्याने दोनशे क्विंटल कांदा उघड्यावर पडला. तसेच शेतकरी शिवाजी खैरनार यांच्या कांदा चाळीवरील पत्रे उडाले व चाळीतील कांदा भिजला.

संजय अहिरे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्याचप्रमाणे धनराज खैरनार, दगडू महाजन, सुरेश खैरनार, दौलत महाजन यांच्याही शेतात पाणी घुसल्याने मिरची, गवार, भेंडी, कारली, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button