राजस्थानमधील ग्रीन लिंक्स स्पायडरवर अमरावती येथील दर्यापुरात संशोधन | पुढारी

राजस्थानमधील ग्रीन लिंक्स स्पायडरवर अमरावती येथील दर्यापुरात संशोधन

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राजस्थानमधील ताल छापर या भागातील ग्रीन लिंक्स स्पायडर पिऊसेटिया छापराजनिर्विन ह्या नवीन प्रजातीचे संशोधन प्रथमच जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर येथे करण्यात आले आहे. येथील स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेत स्पायडर संशोधक प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी या नव्या प्रजातीवर शिक्कामोर्तब केला आहे.

ही प्रजाती राजस्थान मधील चुरू जिल्ह्यातील ताल छापर वाईल्ड लाईफ अभयारण्यात निर्मला कुमारी यांना मिळून आली. ह्या प्रजातीची ओळख पटविण्याचे काम स्पायडर रिसर्च लेबोरेटरी दर्यापूर येथे करण्यात आले. ही प्रजाती बाभळी झाडांच्या हिरव्या पानांवर आढळते. तिचे मागील पाय लांब असतात. त्यामुळे तिची फिरण्याची गती जास्त असते. डॉ.अतुल बोडखे यांच्या नुसार, ही प्रजाती विज्ञानासाठी नवीन आहे. हा स्पायडर घातक छोट्या कीटकांना आपले भक्ष बनवतो. त्याचबरोबर मोथ सारख्या मोठ्या कीटकांना सुद्धा भक्ष बनवतो आणि जगलाचे संवर्धन करतो. तसेच हा निशाचर कोळी असून जंगलामध्ये रात्री कीटकांची शिकार करतो. हा कोळी जंगलामधील हिरव्या झुडपांमध्ये लपून बसतो. तेथील येणाऱ्या सर्व कीटकांना आपले भक्ष बनवतो आणि सूक्ष्म वातावरणाचे संवर्धन करतो.

निर्मला कुमारी ह्या स्पायडर संशोधक असून त्या स्पायडरवर विनोद कुमारी यांच्या मार्गदर्शनात राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे संशोधन करीत आहेत. फिल्ड सर्वे करीत असताना निर्मला कुमारी यांना ही प्रजाती ताल छापर अभयारण्यात आढळून आली आहे. हे संशोधन आफ्रिकेमधील बहुप्रचलित असलेल्या सर्केट या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाबद्दल श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेकांनी डॉ. अतुल बोडखे यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा :

Back to top button