हिंदू विवाह सोहळा नाचगाणे, खाणेपिणे आणि आर्थिक व्यवहाराचे साधन नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा | पुढारी

हिंदू विवाह सोहळा नाचगाणे, खाणेपिणे आणि आर्थिक व्यवहाराचे साधन नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हिंदू पद्धतीने होणारा विवाह सोहळा हा केवळ नाचगाणे, खाणेपिणे, मौजमजा आणि वधू पक्षाकडून हुंडा घेऊन आर्थिक व्यवहार करण्याचे साधन नाही, अशा कडक शब्दांत फटकारतानाच हिंदू विवाह कायद्यानुसार होणाऱ्या अशाप्रकारच्या विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.2) दिला.

हिंदू विवाह हा एकप्रकारे संस्कार आहे. भारतीय समाजात विवाह संस्थेला नीतीमूल्याचा दर्जा दिला पाहिजे, असे न्यायमूर्ती व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय देताना सांगितले. हिंदू विवाह सोहळा झाला नसताना दोन प्रशिक्षित वैमानिकांनी घटस्फोट मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने घटस्फोट घेण्यापूर्वी भारतीय समाजात विवाह संस्थेचे असलेले पावित्र्य लक्षात घेऊन पती-पत्नींनी विवाह संस्थेचे महत्व समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

विवाह समारंभ हा केवळ नाचगाणे, मद्यपान आणि खाणेपिणे, महागड्या भेटवस्तू, हुंड्याची मागणी करण्यासाठी नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. विवाह समारंभात अशाप्रकारचे गैरप्रकार केल्यास कठोर फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. विवाह हा स्त्री – पुरुष संबंधातील पवित्र सोहळा आहे, याचे पावित्र्य जपण्याची गरज आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Back to top button