वटसावित्री पौर्णिमेला पंधरा वर्षांनी ‘ती’ला भेटले सौभाग्य | पुढारी

वटसावित्री पौर्णिमेला पंधरा वर्षांनी 'ती'ला भेटले सौभाग्य

नाशिक (निफाड) पुढारी वृत्तसेवा : सत्यवान सावित्रीच्या कथेला साजेशी घटना निफाडमधील दोन शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने सत्यात उतरली आहे. विशेष बाब म्हणजे अचानकपणे सेवेतून रजा टाकून निघून गेलेले सूर्यकांत पाटील त्यांच्या परिवाराला तब्ब्ल १५ वर्षांनी भेटले.

एखाद्या चित्रपटात गायब झालेली व्यक्ती शोध घेऊनही सापडत नाही आणि अचानकपणे ती व्यक्ती कुटुंबाला फोनवर संपर्क करते. या कथानकात देवदूत बनलेले बाळासाहेब पाखरे व विजय खालकर हे निफाडमधील शिक्षण विभागाशी निगडीत दोघेजण आपल्या जिज्ञासुपणामुळे पाटील परिवाराचे गळ्यातील ताईत झाले आहेत.

रत्नागिरीतील देवगड पंचायत समितीत शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत मनोहर पाटील 15 वर्षापूर्वी (3 ऑगस्ट 2006 ला) किरकोळ रजा टाकली. परंतु किरकोळ रजा टाकून गेलेले सूर्यकांत पाटील घरी परतलेच नाही. त्यांचा शोघ घेऊनही काहीच पत्ता लागला नाही. कुटुंबाने त्यांच्या परतण्याची आशाही आता सोडून दिली होती. पण अचानकपणे सेवेतून रजा टाकून निघून गेलेले सूर्यकांत पाटील त्यांच्या परिवाराला काल वटपोर्णिमेला तब्ब्ल १५ वर्षांनी भेटले आहेत.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील बाळासाहेब पाखरे व विजय खालकर यांच्या जिज्ञासुपणामुळे हे शक्य झाले आहे. त्यांच्याचमुळे एका पत्नीला 15 वर्षांनी आपले सौभाग्य व दोघा मुलांना आपले वडील भेटले आहेत. सुमारे 15 वर्ष 10 महिने 11 दिवसांनी काल वटसावित्री पौर्णिमेला त्‍यांची आणि कुटुंबाची भेट  झाली आहे.

सूर्यकांत मनोहर पाटील हे देवगड पंचायत समिती शिक्षण विभागात वरीष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. ते ३ ऑगस्ट २००६ रोजी कार्यालयात किरकोळ रजा टाकून गेले. त्‍यानंतर ते महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रांत भटकंती करत आणि मिळेल ती सेवा करत आपल्या पोटाची खळगी भरत होते. ते नाशिक, पंढरपूर, तुळजापुर, गाणगापुर, शिर्डी, ञ्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्रात फिरत होते. तसेच पंजाबमध्ये सुवर्णमंदिर व बाबा बुढाजी गुरुद्वारा येथे नांदेडला उर्वशी महादेव मंदिर व जागृत हनुमान देवस्थान येथेही अनेक वर्षे त्यांनी घालविली.

दरम्‍यान, नाशिकरोड परिसरातून जात असताना प्राथमिक शिक्षक बाळासाहेब पाखरे यांची 3 जुनला सूर्यकांत पाटील यांच्याशी भेट झाली. पाखरे यांनी सर्व घटना निफाड पंचायत समितीतील गटसाधन केंद्राचे विजय खालकर यांच्या कानावर घातली. खालकर यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मित्र परिवाराशी संपर्क करत सूर्यकांत पाटील यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. दरम्यान पाटील यांची पेन्शन त्यांची पत्नी घेत असल्याचे समजले. यावरून देवगड पंचायत समिती शिक्षण विभागात संपर्क केला व तेथील वरिष्ठ सहाय्यक यांच्याशी संपर्क करुन पाटील यांच्या कुटुंबाची माहिती मिळवली. पाटील यांची पत्नी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग येथे राहत असल्याचे समजले. आणि अखेर सूर्यकांत पाटील हे १४ जून रोजी वटसावित्री पौर्णिमेला आपल्या घरी पोहचले.

हेही वाचा  :

Back to top button