नाशिक मनपा निवडणूक : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तीन पक्ष येणार आमनेसामने | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तीन पक्ष येणार आमनेसामने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या, तरी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी मात्र जोरात सुरू आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक जिंकून महापालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय समीरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, नाशिकमध्ये शिवसेना, भाजप आणि नव्याने हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या हाती घेतलेल्या मनसे या तीन पक्षांमध्ये मतांसाठी चढाओढ दिसून येणार आहे.

महापालिका निवडणुकीत खरी काट्याची लढत ही शिवसेना आणि भाजप या पूर्वीची युती असलेल्या दोन पक्षांमध्येच होणार आहे. दुसर्‍या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे, तर तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस दिसून येणार आहे. त्यामुळे आतापासूनच सत्तेची चावी आपल्या हाती घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच होणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये आधीच जोरदार दावे-प्रतिदावे सुरू झालेले आहेत. भाजपकडून शिवसेनेला याच मुद्द्यावरून वारंवार कोंडीत पकडण्याचे काम सुरू असतानाच, मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दोन्ही पक्षांचे लक्ष विचलित केले आहे. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसे या पक्षाने प्रथमच नाशिक महापालिका आपल्या हाती खेचून आणली होती आणि ही पहिलीच महापालिका मनसेच्या द़ृष्टीने महत्त्वाची ठरली होती.

त्या आधीही मनसेने आपले 13 नगरसेवक महापालिकेत निवडून आणले होते. 2017 मध्ये मात्र मनसेला आपला करिश्मा टिकवून ठेवता आला नाही आणि भाजपने नाशिक महापालिकेवर आपला भगवा फडकविला. आता आगामी महापालिका निवडणुकीकरिता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात टक्कर पाहायला मिळेल. मनसेला पूर्वीप्रमाणेच मतदार स्वीकारणार, भाजपकडेच पुन्हा सत्तेच्या चाव्या सोपविणार की, शिवसेनेने दिलेल्या अनेक आश्वासनांवर आरूढ होऊन पुन्हा शिवसेनेचा भगवा मनपावर फडकणार, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण यापूर्वीदेखील नाशिककरांनी शिवसेनेच्या हाती महापालिकेचा कारभार सोपविलेला आहे आणि तोही एकदा नव्हे, तर दोन वेळा. त्यामुळे या वेळी नाशिककर कुणाला पसंती देतात, याकडे लक्ष लागून आहे.

तयारी करण्यास भरपूर कालावधी
येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असून, सर्वच राजकीय पक्षांना तयारी करण्यास भरपूर कालावधी मिळालेला आहे. याशिवाय बहुतांश सर्वच पक्षांच्या द़ृष्टीने नाशिक महापालिकेची प्रभाग रचना योग्य झाल्याने मतदारांवरच खर्‍या अर्थाने इच्छुकांची आणि राजकीय पक्षांची मदार आहे.

पक्षांचे दावे प्रतिदावे
भाजपने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामे आणि प्रकल्प यांचे दाखले दिले जात आहेत. अनेक कामांची उद्घाटने होऊन मार्गी लागली आहे, तर अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने शिवसेनेकडून नाशिक शहराच्या द़ृष्टीने सत्ता हाती आल्यास काय काय करणार, याबाबतची वचने दिली जात आहेत, तर मनसेकडून 2012-17 या कालावधीत केलेल्या कामांचे दाखले दिले जात आहेत. विशेष म्हणजे मनसेने मनपाच्या तिजोरीवर फारसा भार पडणार नाही, या द़ृष्टीने सीएसआरअंतर्गत कामे करून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा :

Back to top button