एकेकाळी झाडावर राहत असत कोंबड्या! | पुढारी

एकेकाळी झाडावर राहत असत कोंबड्या!

वॉशिंग्टन ः मानव जातीच्या विकासाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. माणसाची सामाजिक विण बनत असताना पशुपक्ष्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरलेली आहे. आता एक्सेटर युनिव्हर्सिटीने याबाबत नवे संशोधन केले आहे. त्यामधून असे दिसून आले की कोंबडा-कोंबडीला पाळीव बनवण्यासाठी सुमारे 3500 वर्षांचा कालावधी लागला. कोंबड्या आधी झाडावर राहत होत्या व शेतीचा काळ सुरू झाल्यावर त्या जमिनीवर आल्या!

कोंबड्यांचा संबंध आशियातील भाताच्या शेतीशी जोडला जातो. या पक्ष्याला आधी विचित्र मानले जात होते. अनेक शतकांनंतर त्याचा मानवी आहारातही समावेश झाला. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी कोंबड्या चीन व आग्नेय आशियात तसेच भारतात होत्या तसेच युरोपमध्ये सुमारे सात हजार वर्षांपूर्वी कोंबड्या आल्या असे म्हटले जात होते. आता नव्या संशोधनाने म्हटले आहे की आग्नेय आशियातील भाताच्या वाळलेल्या शेतीने सर्व द़ृश्य बदलून टाकले. भाताच्या शेतीमुळे कोंबड्या झाडावरून खाली येऊन दाणे टिपू लागल्या. त्यावेळेपासूनच कोंबड्या शेतकर्‍यांचे घनिष्ठ बनत चालले.

जंगली कोंबड्या आता माणसांमध्ये राहण्यास शिकल्या. त्यावेळेपासूनच माणसाने कोंबड्या पाळणे सुरू केले. इसवी सन पूर्व 1500 या काळात आग्नेय आशियात कोंबड्या पाळण्याची प्रक्रिया सुरू झाली. युरोपमध्ये लोह युगाच्या काळात कोंबड्यांची पूजा केली जात असे. त्यांना भोजन म्हणून पाहिले जात नव्हते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या दफन केल्या जात असत. बि—टनमध्ये तर तिसर्‍या शतकापर्यंत कोंबडीचे मांस खाल्ले जात नसे.

Back to top button