रामनगर : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे सुरू असलेली अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे धूसर झाली आहेत. समोरून येणार्या टेम्पो ट्रॅव्हलरला चुकविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहनच्या बसची अर्धवट पुलाला धडक बसल्याने नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अनमोडजवळ हा अपघात घडला.
हुबळीहून पणजीला जाणारी बस साधू कत्रीवरील पुलाजवळ आली असता गोवा येथून रामनगरच्या दिशेने येणार्या टेम्पो ट्रॅव्हलरला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने बसवरील नियंत्रण गमावले.
अर्धवट असलेल्या पुलाच्या खांब्याला धडकल्याने 9 जण जखमी झाले. तर बस चालक बसप्पा इटगी (रा. गदग) हा गंभीर जखमी झाला. बसाप्पा यांच्यावर रामनगर सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून अधिक उपचारसाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले. जखमी राघवेंद्र हुगार हुबळी, सादिक जवळी हुबळी, तिम्माणा विहार हल्याळ, नागराज घोटगाळकर तेरगाव, देवराज मुळेर हुबळी, राघवेंद्र सुणगार हुबळी, तुकाराम बांदोडकर माडीगुंजी या जखमींवर रामनगरमधील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
दोन दिवसांत दोन अपघात
अर्धवट स्थितीतील रस्ता कामामुळे गेल्या दोन दिवसात घडलेला हा दुसरा अपघात असून प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जागोजागी धोक्यांचा सामना करावा लागत आहे.