एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास संपणार ; राष्ट्रवादीकडून आमदारकीची लॉटरी? | पुढारी

एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास संपणार ; राष्ट्रवादीकडून आमदारकीची लॉटरी?

जळगाव: राज्यात विधानपरिषद निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. २० जूनला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काही नावे निश्चित झाली आहे. यात विशेष म्हणजे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीकडून खडसेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सुरु आहे. विधानपरिषदेसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तर ही त्यांच्यासाठी मोठी संधी समजली जात आहे.

राज्यातील दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जातं. खान्देशात भाजपची पाळेमुळे रुजविण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. मात्र, राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर खडसे नाराज झाले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमधील मतभेद वाढू लागले. पुढे भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. पण त्यांच्या नाराजीची पक्षश्रेष्ठींकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे खडसेंनी भाजपला ‘जय श्रीराम’ करत, राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले.

राज्यपालांच्या आडकाठीमुळे पहिली संधी हुकली

जानेवारी 2021 मध्ये एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश असणारी 12 विधानपरिषद सदस्यांच्या नामनिर्देशनाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात आली. मात्र त्यांनी या यादीवर आतापर्यंत देखील निर्णय घेतलेला नाही. साहजिकच विधानपरिषदेवर जाण्याची खडसेंची संधी यामुळे हुकल्याचे मानले जात होते. मात्र आता विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ना पक्षाचा फायदा, ना खडसेंना लाभ

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, अशी खात्री शरद पवारांनी व्यक्त केली होती. पण, दीड वर्षातील एकूणच स्थिती बघता, तसे काही झालेले नाही. खडसेंच्या मतदार संघातील बोदवड नगर पालिकेतही राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला. याठिकाणी शिवसेनेनं बाजी मारुन सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीत खडसेंचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे कुठले पदच नाही तर प्रभाव कसा दाखविणार? असा दावा खडसे समर्थकांकडून केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button