सांगलीत कायद्याचे ‘रक्षक’च असुरक्षित! | पुढारी

सांगलीत कायद्याचे ‘रक्षक’च असुरक्षित!

सांगली : सचिन लाड गेल्या 24 तासांत सांगली शहरात दोन पोलिसांवर हल्ला झाल्याने कायदा आणि सर्वसामान्यांचे ‘रक्षण’ करणारे ‘खाकी’ वर्दीतील ‘रक्षक’च उसरक्षित असल्याचे चित्र आहे. ‘वर्दी’वर हात घालणारे हल्लेखोर मात्र अजूनही मोकाटच आहेत.

पूर्वी रस्त्यावरून पोलिस निघाले की, पळताभुई थोडी व्हायची. हातात काठी…डोक्यावर टोपी व अंगातील खाकी वर्दीमुळे एक वेगळाच दबदबा होता. आता तो दबदबा कमी होताना दिसत आहे. टोपीची तर ‘अ‍ॅलर्जी’ झालीय. हातातील काठी गायब झाली आहे. आंदोलन, बंदोबस्त किंवा कुठे अनुचित प्रकार घडला तरच हातात काठी दिसते.

गेल्या 24 तासांत दोन पोलिसांवर हल्ला झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे म्हटले तर नोकरी पुढे दिसते. आपल्या हातून विपरीत घडले तर निलंबित होऊ शकतो, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळतो. संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला कायद्यानेच उत्तर दिले जाते. 3 जून रोजी संजयनगर पोलिस ठाण्यातील हवालदार अमोल नायर यांच्यावर चौघांनी हल्ला केला. ही घटना ताजी असतानाच शहर पोलिस ठाण्यातील गणेश कांबळे यांच्यावर मुख्य बसस्थानकावर हल्ला झाला. काही पोलिसांवर गंभीर आरोप होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक, हवालदार यांच्यावर बलात्कारासारखे गुन्हेही दाखल झाले. पोलिसांची प्रतिमा मलिन होण्यास व दबदबा कमी होण्याचे हेही एक कारण आहे.

समाधान मांटे यांचा भोसकून खून 

पाच वर्षांपूर्वी पोलिस शिपाई समाधान मांटे यांचा कुपवाड फाट्यावरील हॉटेल रत्नाच्या आवारात चाकूने सपासप वार करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. खून होताना अनेकांनी पाहिले. पण मांटे यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे गेले नाही. खुनाच्या या घटनेने पोलिस यंत्रणेला फार मोठा धक्का बसला होता. मांटे हे मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेत नेमणुकीस होते. केवळ सहा वर्षे त्यांची पोलिस दलात सेवा झाली होती.

नाकाबंदीत अंगावर गाडी घालण्याचे प्रकार 

चौका-चौकांतील गस्त कमी झाली आहे. वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिस कर्मचारीही जे आहे तेवढेच काम करून गप्प आहेत. ‘वर्दी’चा आक्रमकपणा वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. नाकाबंदी केल्यानंतर वाहने अडविली जातात. पण काही वाहनधारक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून जातात.

Back to top button