नाशिक : बार असोसिएशन अध्यक्षपदी अ‍ॅड. ठाकरे यांची हॅट्ट्रिक | पुढारी

नाशिक : बार असोसिएशन अध्यक्षपदी अ‍ॅड. ठाकरे यांची हॅट्ट्रिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा अ‍ॅड. नितीन ठाकरे हे अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. दोन दिवस सुरू असलेल्या मतमोजणीचा अंतिम निकाल रविवारी (दि. 8) सायंकाळी जाहीर झाला. त्यानंतर अ‍ॅड. ठाकरे समर्थक वकिलांनी जयघोष करीत, गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यंदाच्या निवडणुकीत 11 सदस्यांपैकी आठ नवीन उमेदवारांना मतदार वकिलांनी कौल दिला आहे.

नाशिक बार असोसिएशनची चार वर्षांनंतर निवडणूक होत असते. मागील कार्यकारिणीची मुदत 2020 मध्ये संपली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 11 सदस्यांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. त्यात आजी-माजी उमेदवारांसह नवीन उमेदवारांनीही नशीब आजमावले होते. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. ठाकरे यांच्यासह अ‍ॅड. महेश आहेर व अ‍ॅड. अलका शेळके होत्या.

न्यायालयाच्या जागेचा विस्तार व नवीन न्यायालयीन इमारत हा मुख्य मुद्दा निवडणुकीत गाजला. अनेकांनी न्यायालयीन जागा व इमारत आपल्याच प्रयत्नांमुळे अस्तित्वात येत असल्याचा दावा केला होता. मात्र, मतदारांनी सलग तिसर्‍या निवडणुकीत अ‍ॅड. ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विजयी केले. विजयानंतर समर्थकांना ’पुन्हा एकदा ठाकरे सरकार’ असा जयघोष करीत जल्लोष केला. यावेळी विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. बिपीन शिंगाडा हे अध्यक्षपदी असून, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. संदीप डोंगरे, सदस्य म्हणून भगवंतराव पाटोळे व अ‍ॅड. अतुल गर्गे यांनी कामकाज पाहिले.

अध्यक्षपदावर असताना वकिलांसाठी केलेल्या कामामुळे वकिलांनी सलग तिसर्‍यांदा माझ्यावर विश्वास ठेवत विजयी केले आहे. भविष्यातही कामाचा आलेख उंचावत ठेवणार असून, वकिलांच्या हिताची कामे जास्तीत जास्त करण्यावर भर राहील.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार

अ‍ॅड. आहेर 134 मतांनी पराभूत
या निवडणुकीत तीन हजार 664 मतदारांपैकी दोन हजार 735 मतदार वकिलांनी मतदान केले. अ‍ॅड. ठाकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. महेश आहेर यांचा 134 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून अ‍ॅड. ठाकरे आघाडीवर होते. तर नव्याने निवडणूक लढवणार्‍या अ‍ॅड. वैभव घुमरे यांना विजयी उमेदवारांपैकी सर्वाधिक एक हजार 402 मते पडली असून, त्याखालोखाल उपाध्यक्षपदी निवडणूक आलेले अ‍ॅड. वैभव शेटे यांना एक हजार 400 मते पडली आहेत. तसेच सहसचिव पदासाठीच्या लढतीत शेवटपर्यंत चुरस कायम होती. यामध्ये सहसचिवपदी संजय गिते व शरद मोगल यांच्यात लढत झाली. एकेवेळी दोघांमध्ये केवळ तीन मतांचा फरक होता. मात्र, शेवटी हा फरक वाढून गिते हे 40 मतांनी निवडून आले.

उपाध्यक्षपदी शेटे यांची बाजी
या निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आहूजा यांच्यासमोर अ‍ॅड. वैभव शेटे यांनी आव्हान उभे केले होते. यामध्ये शेटे यांना 1 हजार 390 मते मिळाली असून, त्यांनी अ‍ॅड. आहूजा यांचा 500 हून अधिक मतांनी पराभव केला. तर सचिवपदी अ‍ॅड. हेमंत गायकवाड, शरद गायधनी, सुरेश निफाडे, अ‍ॅड. सय्यद यांच्यात लढत झाली, त्यात अ‍ॅड. गायकवाड यांनी विजय संपादित केला. खजिनदारपदी अ‍ॅड. हर्षल केंगे व अ‍ॅड. कमलेश पाळेकर यांच्यात लढत झाली. त्यात अ‍ॅड. पाळेकर यांना 1 हजार 177 तर केंगे यांना 909 मते मिळाली.

विजयी उमेदवार व मते
अध्यक्ष – अ‍ॅड. नितीन ठाकरे 1,388
उपाध्यक्ष – अ‍ॅड. वैभव शेटे 1,400
सचिव – अ‍ॅड. हेमंत गायकवाड 1,091
सहसचिव (पुरुष) – अ‍ॅड. संजय गिते 1,081
सहसचिव (महिला) – अ‍ॅड. सोनल गायकर 1,183
खजिनदार – अ‍ॅड. कमलेश पाळेकर 1,183
सदस्य – अ‍ॅड. शिवाजी शेळके 995
सदस्य – अ‍ॅड. प्रतीक शिंदे 852
सदस्य – अ‍ॅड. महेश यादव 811
सदस्य महिला – अ‍ॅड. अश्विनी गवते 1,326
सात वर्ष आतील – अ‍ॅड. वैभव घुमरे 1,402

हेही वाचा :

Back to top button