लोणंद : टँकरच्या धडकेत आजोबा-नातू ठार | पुढारी

लोणंद : टँकरच्या धडकेत आजोबा-नातू ठार

लोणंद ; पुढारी वृत्तसेवा : लोणंद-नीरा रस्त्यावर भवानीमाता मंदिरासमोरच्या उतारावर लुनाला टँकरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बाळूपाटलाचीवाडी गावचे माजी सरपंच व त्यांचा नातू हे दोघे ठार झाले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

बाळूपाटलाचीवाडी गावचे माजी सरपंच हणमंत दिनकर धायगुडे (वय 65) व त्यांचा नातू ओम विजय धायगुडे (वय 10) हे दोघे बाळूपाटलाचीवाडी येथून एक्सएल लुना मोपेडगाडी (क्रमांक एम. एच 11 बी. आर 7190) वरून लोणंद – नीरा रस्त्यावरून लोणंद बाजूकडून नीरेकडे निघाले होते.

याचदरम्यान भवानी माता मंदिर चढावर आल्यावर तेथे गाडी थांबवून मंदिरात देवदर्शन करून पुन्हा लुना गाडीवर बसून नीरेकडे जायला निघाले असताना पाठीमागून आलेल्या टँकरने (क्रमांक एम. एच 12 एस. एक्स 5215) त्यांच्या लुना गाडीला धडक दिली. यामध्ये हणमंत धायगुडे हे जागीच ठार झाले. तर नातू ओम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला लोणंद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्याचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर लोणंद पोलिस ठाण्याचे स.पो.नि. विशाल वायकर व पोलिस कर्मचार्‍यांनी मृत व जखमी या दोघांनाही लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

दरम्यान, या घटनेतील टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला असून टँकर चालक पसार झाला आहे. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button