सांगली : राज ठाकरेंची भूमिका जाती-धर्मात द्वेष पसरवणारी | पुढारी

सांगली : राज ठाकरेंची भूमिका जाती-धर्मात द्वेष पसरवणारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा राज ठाकरे हे जाती-धर्मात द्वेष पसरविणारे राजकारण करीत आहेत. बाळसाहेब ठाकरे यांनी असे कधीही केले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्यांना ते जमले नाही म्हणून जाती-धर्मात द्वेष निर्माण करणारी बेताल वक्तव्ये करीत ते फिरत आहेत. अशाने त्यांचा पक्ष वाढणार नाही. मशिदीवरील अजान बंद करावे म्हणून त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही मशिदीच्या प्रमुखांनी अजान स्वत:हून काढून घेतले आहे. अजानाचा आवाज प्रश्न काही महत्त्वाचा नाही. याउलट हिंदूमधील गणपती उत्सव, भीमजयंती, नवरात्र उत्सवामधील वाद्यांचे आवाज हे अजानपेक्षा जास्त असतात.

ते पुढे म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे म्हटले आहे. या भूमिकेला रिपाइंचा पाठिंबा आहे. मराठा, दलित, प्रत्येक समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी भूमिका असते. रिपाइं हा जातीभेद न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे ब्राह्मण असला तरी तो मुख्यमंत्री होण्याला कोणताही विरोध नाही. भाजप हा संविधानाला विरोध न करणारा पक्ष आहे. संविधानाला गालबोट लागणार नाही, यासाठी आमचे लक्ष असते.

मंत्री आठवले म्हणाले, मराठा समाज व ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही. याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. कारण न्यायालायात सरकारला आपले म्हणणे सादर करता आले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे न्यायालयाचे मत आहे. परंतु त्यात गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, हे ठाकरे सरकारला सांगता आले नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे.

तसेच ओबीसी समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. जातीवर आधारित जनगणना करावी, अशी आमची मागणी आहे. त्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देता येते. ते म्हणाले, सध्या आम्ही भाजपबरोबर गेलो असलो तरी आमची स्वतंत्र ओळख आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केलेला आहे. तशा पद्धतीने प्रयोग करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. यावेळी नगरसेवक विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, महिला आघाडीच्या छाया सरवदे उपस्थित होते.

भीमा-कोरेगाव दंगल एल्गार परिषदेमुळे नाही

भीमा – कोरेगाव दंगलीतून संभाजी भिडे यांना क्लिनचिट दिल्याचा आरोप होत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, भीमा-कोरेगाव दंगलीबाबत तपासासाठी समिती नेमली होती. ती देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नेमली होती. त्यांनी त्यांचे काम चांगले केलेले आहे. असे असले तरी ही दंगल एल्गार परिषदेतील भाषणामुळे झाली असा जो आरोप केला जातो, तो खोटा आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button