चंद्रावर मानवी ‘डीएनए’ची बँक | पुढारी

चंद्रावर मानवी ‘डीएनए’ची बँक

मानवी डीएनएच्या बँकेची स्थापना चंद्रावर होणार आहे. या पृथ्वीवरील मानवाचा अंत झाला, तर ही बँक मानवी संस्कृती पुन्हा सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु, एकही माणूस उरला नाही, तर बँकेचे काय होणार, याचाही विचार करण्यात आला आहे.

पृथ्वीवर असंख्य धोके सातत्याने घोंगावत असतात. दरवर्षी हजारो उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतात आणि कधी-कधी शास्त्रज्ञांनाही धोका जाणवतो. शास्त्रज्ञ उल्कांमुळे उद्भवणार्‍या धोक्याचा सामना करण्याचे मार्ग शोधत आहेत. नासा ही अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्था असा विचार करत आहे की, धोकादायक उल्कापिंड पृथ्वीवर आदळण्यापूर्वी अण्वस्त्रांच्या मदतीने नष्ट करता येतील का? रॉकेट, बूस्टर आदींच्या मदतीने उल्कापिंडाची दिशा बदलता येईल का? दोन्ही उपायांवर आतापर्यंत फारसे काम झालेले नाही. परंतु, शास्त्रज्ञांना असेही वाटते की, याहून धोकादायक उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास काय होईल? पृथ्वीवरील मानवजातीचा अंत झाला तर काय होईल? एक उपाय अमेरिकी उद्योजकाकडून पुढे आला आणि तो खूपच रंजक आहे.

उद्योजक बेन हल्डमन हे लाईफशिप नावाच्या स्टार्टअपचे संस्थापक आहेत. त्यांचे एकच ध्येय आहे. मानवी बीज बँक तयार करणे. दुसर्‍या शब्दांत मानवी डीएनए या बँकेत संग्रहित केला जाईल. या बँकेची स्थापना चंद्रावर होणार आहे. या पृथ्वीवरील मानवाचा अंत झाला, तर ही बँक मानवी संस्कृती पुन्हा सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु, एकही माणूस उरला नाही, तर बँकेचे काय होणार, याचाही विचार करण्यात आला आहे. अशावेळी कधीतरी इतर कुठल्यातरी ग्रहावरून प्राणी किंवा एलियन्स येऊन चंद्रावर पोहोचतील आणि त्या बँकेच्या मदतीने माणसासारखी सुंदर सृष्टी पुन्हा निर्माण करतील.

संबंधित बातम्या

पृथ्वीवर विनाश झाल्यास केवळ मानवी बीज बँक मानवतेच्या पुनर्जन्माची शक्यता जिवंत ठेवेल. लाईफशिप या कंपनीची स्थापना 2019 मध्ये झाली. ही कंपनी लाळेच्या स्वरूपात लोकांचे डीएनए चंद्रावर पाठविण्याची ऑफर देते. हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या लाळेसाठी चंद्राचे एकेरी तिकीट आहे. तुमची लाळ चंद्रावरील मानवी बीजपेढीत कायम राहील. शास्त्रीय द़ृष्टिकोनातून मानवी डेटा किंवा मानवी अस्तित्वाचा गाभा कायमस्वरूपी जतन करण्याचे हे काम आहे. अशा बँकेची स्थापना सौरमंडलाच्या विविध भागांमध्ये आणि त्याहूनही पुढे केली जाणे शक्य आहे.

ही कंपनी या वर्षाच्या मध्यात मानवी डीएनएची पहिली खेप चंद्रावर पाठवणार आहे. पहिल्या उड्डाणाची तयारी पूर्ण झाली आहे. बुकिंग बंद झाले आहे. दुसर्‍या उड्डाणासाठी बुकिंग सुरू असून, हे उड्डाण या वर्षाच्या अखेरीस प्रस्तावित आहे. मानवी डीएनएची बँक तयार करण्याचा हा प्रयत्न एकट्याचा नाही.

गेल्या वर्षीच अ‍ॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेकेन थांगा आणि त्यांच्या टीमने एक योजना तयार केली. याअंतर्गत केवळ मानवच नव्हे, तर इतर सजीवांच्याही बीजांचे जतन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. 67 लाख प्रजातींपैकी प्रत्येक प्रजातीचे 50 नमुने घेतले जातील. याचा अर्थ चंद्रावर किमान 33.50 दशलक्ष नमुने पाठविले जातील आणि त्यासाठी 250 रॉकेटस्चे प्रक्षेपण करावे लागेल.

आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राच्या उभारणीला जेवढा खर्च आला, त्याच्या सहापट खर्च यासाठी येईल. परंतु, विनाशाची भीती जेव्हा मानवाला सतावू लागते, तेव्हा माणूस स्वतःला वाचविण्यासाठी जे काही करतो, ते थोडेच असते. आपण सरकारी पातळीवर पाहिले, तर नॉर्वेनेही असाच प्रयत्न केला आहे. आर्क्टिकजवळ वनस्पतींच्या बीजांचा मोठा संग्रह तयार केला आहे. असो, आजच्या काळात विनाशानंतरच्या परिणामांचा विचार करण्यापेक्षा कोणत्याही प्रकारचा विनाश थांबविणे अधिक महत्त्वाचे आहे.

– प्रा. विजया पंडित

Back to top button