नाशिकरोड : वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर हल्ला; लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

नाशिकरोड : वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर हल्ला; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : येथील वृत्तपत्र विक्रेते अनिल कुलथे यांच्या घरावर शुक्रवारी (दि. 7) रात्री परिसरातील एका टोळक्याने हल्ला केला. त्यात कुलथे यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

यासंदर्भात अनिल कुलथे यांच्या पत्नी उषा कुलथे (रा. पाटील गॅरेजच्या मागे, देवळाली गाव) यांनी यासंदर्भात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, कुलथे कुटुंबीय रात्री घरात असताना परिसरातच राहणारे संशयित योगेश आव्हाड, प्रिन्स लांबा, किरण शिंदे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून कुलथे यांच्या घरावर दगडफेक केली. त्यात कुलथे यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा तसेच चारचाकी (क्र. एमएच 15 एच 7936) या वाहनाचे काचा फुटल्या आहेत, तर दुचाकी (क्र. एमएच 15 एडी 8684) ची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच हल्लेखोरांनी कुलथे कुटुंबीयांना शिवीगाळ करीत मारहाणही केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पोलिस निरीक्षक गणेश न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button