साखळी ओढल्याने एक्स्प्रेस थांबली नदीच्या पुलावर | पुढारी

साखळी ओढल्याने एक्स्प्रेस थांबली नदीच्या पुलावर

मुंबई/डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याणकडून गोरखपूरकडे जाणार्‍या गोदान एक्स्प्रेसची त्याच एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या अज्ञात प्रवाशाने चेन खेचल्याने ही एक्स्प्रेस आंबिवली ते शहाड दरम्यान थांबली. मात्र ज्या बोगीतील चेन खेचण्यात आली होती, ती बोगी नदीवरील पुलावर थांबल्याने ही चेन सुस्थितीत आणण्याचे आव्हान रेल्वेसमोर उभे ठाकले होते. अखेर गोदान एक्स्प्रेसचे असिस्टंट लोको पायलट सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक्स्प्रेसखालील पुलाच्या रेलिंगवरून जात ब्रेकचा खटका वर केला आणि त्यानंतर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली.

मुंबईकडून गोरखपूरकडे जाणारी गोदान एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून कसार्‍याच्या दिशेने मार्गस्थ झाली. दुपारच्या सुमारास ही एक्स्प्रेस शहाड आणि आंबिवली दरम्यान असलेल्या उल्हास नदीवर रेल्वेच्या पुलावरून जात होती. मात्र अचानक अज्ञात प्रवाशाने एक्स्प्रेसच्या बोगीमधील अत्यावश्यक चेन खेचली. त्यामुळे एक्स्प्रेसला इमर्जन्सी ब्रेक लागला आणि ती जागच्या जागी थांबली. मात्र ज्या बोगीतील चेन खेचण्यात आली होती, ती बोगी नदीच्या पुलावर होती. रेल्वेचा नदीवरील पूल केवळ रूळाइतकाच असल्याने या पुलावर उभे राहणेदेखील अशक्य होते. त्यामुळे एक्स्प्रेसखाली जाऊन ब्रेकचा खटका वर करण्याचे आव्हान होते. अखेर या एक्स्प्रेसचे असिस्टंट लोको पायलट सतीश कुमार यांनी मोटारमनची परवानगी घेत एक्स्प्रेसला लटकून, खाली घुसून त्यांनी खटका वर केल्यानंतर ही एक्स्प्रेस कसार्‍याच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र एक्स्प्रेसचे असिस्टंट लोको पायलट सतीश कुमार यांच्या समयसूचकतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

मुंबई विभागात 16 ते 30 एप्रिल या कालावधीत चैन पुलिंगच्या 197 घटना घडल्या आहेत. यामध्ये युपी-बिहारला जाणार्‍या गाड्यांमध्ये सर्वाधिक चैन पुलिंग होत आहे. 12143 एलटीटी-सुतलानपूर, 11055 एलटीटी-गोरखपूर, 11059 एलटीटी-छापरा, 11061 एलटीटी-दरभंगा, 111071 एलटीटी-वाराणसी, 12115 सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, 12137 पंजाब मेल, 12167 एलटीटी- बनारस,12141 एलटीटी-पाटलीपुत्र,12534 सीएसएमटी-लखनऊ पुष्पक एक्सप्रेस, 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन, 12809 सीएसएमटी- हावडा मेल, 15017 एलटीटी-वाराणसी काशी एक्स्प्रेस, 15666 पनवेल-गोरखपूर, 22221 राजधानी एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक चैन पुलिंग होते.

लोको पायलट सतीश कुमार यांच्या धाडसाचे कौतुक

हा सर्व प्रकार असिस्टंट लोको पायलट सतीश कुमार यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या एका मदतनीसाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. असिस्टंट लोको पायलट सतीश कुमार यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सतीश कुमार यांच्या धाडसाचे कौतुक तर केलेच, शिवाय प्रवाशांनी कारण नसताना आपल्याबरोबर प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर बोलताना केले आहे.

Back to top button