नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद; परफेक्ट बिल्डकॉन चॅम्पियन स्पर्धा | पुढारी

नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद; परफेक्ट बिल्डकॉन चॅम्पियन स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महात्मानगर क्रिकेट मैदानावर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 2021-22 या क्रिकेट हंगामातील 14 वर्षांखालील वयोगटाच्या परफेक्ट बिल्डकॉन चॅम्पियन स्पर्धेचा अंतिम सामना नाशिक क्रिकेट अकादमी विरुद्ध निवेक या दोन संघांत झाला. नाशिक क्रिकेट अकादमीने निवेक संघावर पहिल्या डावातील आघाडी घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तन्मय जगतापचे शतक नाशिक क्रिकेट अकादमीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

या स्पर्धेत 20 संघांत एकूण 44 सामने झाले. अंतिम सामन्यात नासिक क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तन्मय जगताप नाबाद 101 व ज्ञानदीप गवळीच्या 60 धावांच्या जोरावर नाशिक अकादमीने 50 षटकांत 6 बाद 221 डाव घोषित केला. निवेककडून चिन्मय भास्कर 4 बळी घेतले. तर प्रत्युरात्तरात निवेकचा पहिला डावात 30 षटकांत अवघ्या 49 धावांवर आटोपला. नाशिक अकादमीकडून मंथन पिंगळेने 5 बळी घेतले. त्याला समकित मुथा 2 तर ज्ञानदीप गवळी व आर्यन घोडके प्रत्येकी 1 बळी घेत चांगली साथ दिली. तत्पूर्वी, अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी प्रायोजक परफेक्ट बिल्डकॉनचे चेअरमन अनिल आहेर, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे, सहसचिव योगेश हिरे, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब मंडलिक, 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शेखर घोष यांच्यासह दोन्ही संघ प्रशिक्षक व पंच उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक : नाशिक क्रिकेट अकादमी- 50 षटकांत 6 बाद 221 डाव घोषित (तन्मय जगताप नाबाद 101 व ज्ञानदीप गवळी 60 धावा, चिन्मय भास्करचे 4 बळी) निवेक संघ- 30 षटकांत सर्वबाद 49 (मंथन पिंगळे 5 तर समकित मुथाचे 2 बळी). नाशिक क्रिकेट अकादमी पहिल्या डावातील आघाडीवर विजयी.

हेही वाचा:

Back to top button