कोरेगावात सोंग्यातील ईडीचे काल्पनिक पात्र आले अंगलट | पुढारी

कोरेगावात सोंग्यातील ईडीचे काल्पनिक पात्र आले अंगलट

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : कोरेगावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पूजा -पाठ, छबिना, पालखी सोहळा व विविध सोंगांचे कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सोंग्याच्या कार्यक्रमात गावातील युवकांनी ईडीचा फलक लावलेले वाहन शहरभर फिरवरून जनजागृतीचा प्रयत्न केला. यावर पोलिसांची नजर पडल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकांना खडसावून जुजबी दंड केला. त्यामुळे ईडीचे पात्र या युवकांच्या चांगलेच अंगलट आले.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी कारवायांमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत. कोरेगावच्या ग्रामदैवत यात्रेनिमित्त अक्षय तृतीया दिवशी मध्यरात्री पालखी निघते. त्या अगोदर छबिना पालखीमध्ये सामील होण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक सोंग सहभागी होतात. यात्रेतील सोंग्यात युवकांनी महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या ईडी कारवाईचा भाग असलेली पात्र दाखवण्यासाठी सोंगाची तयारी केली. यासाठी विविध जिवंत काल्पनिक पात्र बनवून कागदपत्र हाती धरून व गर्दीत वाहनावर ईडी असा फलक लावून लाल दिवा लावला होता. हे वाहन शहरातून फेरफटका मारत होते. मात्र, सोंग्याचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच ईडीचा फलक लावलेले हे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. यात्रेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ हालचाली गतिमान केल्या.

पोलिसांनी संबंधित वाहन शहरातून शोधून काढले व नेमका काय प्रकार हे जाणून घेतला. त्यावेळी पोलिसांना हे वाहन यात्रेतील असल्याचे समजले. त्यांनी पूर्णत: खातरजमा केली. तेव्हा हा सर्व प्रकार जनजागृती कार्यक्रमासाठी केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी जुजबी दंड आकारून संबंधित सोंग धारण केलेल्या युवकांना सोडून दिले. मात्र, यात्रेच्या सोंगासाठी ईडीचे केलेले पात्र युवकांच्या चांगलेच अंगलटी आले.

Back to top button