त्रिसदस्यीय प्रभाग रचना अन् 92 नगरसेवक | पुढारी

त्रिसदस्यीय प्रभाग रचना अन् 92 नगरसेवक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला कोल्हापूर महापालिका निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 10 मार्च 2022 ला जी स्थिती होती, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. परिणामी, त्रिसदस्य प्रभाग रचना असेल. शहराच्या लोकसंख्येनुसार 31 प्रभाग असतील. नगरसेवकांची संख्या 92 राहील.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठीचा कालावधी आणि पावसाळा यामुळे निवडणूक रणधुमाळी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये माजेल, असे सांगण्यात आले. दरम्यान, 1 जानेवारी 2022 पर्यंतची मतदारयादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. डिसेंबर 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने एक प्रभाग रचनेनुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली होती. तसेच आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. फेब-ुवारी-मार्च 2021 मध्ये मतदारयादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वी कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर आयोगाने पुन्हा एक सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्याची सूचना केली. ती पूर्ण होईपर्यंत राज्य शासनाने बहुसदस्य प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत राज्य शासनाने नगरसेवकांची संख्या वाढवली.

सहा महिन्यांपासून महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा गतिमान झाली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे त्रिसदस्य प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक प्रभाग असे 30 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. 2 नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. शहराच्या लोकसंख्येनुसार एकूण 92 नगरसेवक असतील. 4 मार्च 2022 ला महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल सादर केला आहे. प्रारूप मतदार यादीचेही बहुतांश काम पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाकडून आदेश आल्यास मेअखेर मतदारयाद्यांचे आणि उर्वरित सर्व प्रक्रिया जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाळ्याची स्थिती पाहता कोल्हापुरात महापूर येतो. त्यामुळे निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

यंत्रणा सज्ज

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत निवडणूक विभाग कार्यरत होता. त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. काही दिवसांपासून या विभागाचे कामकाज थांबविण्यात आले. परंतु, आता पुन्हा निवडणूक विभाग कार्यरत करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका यंत्रणाही सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाचे आदेश येताच मतदारयाद्या अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button