नाशिकच्या ‘या’ भागातील नागरिक आठ दिवसांपासून पाण्याविना | पुढारी

नाशिकच्या 'या' भागातील नागरिक आठ दिवसांपासून पाण्याविना

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठाच होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पाथर्डीकरांवर आली आहे. तसेच अनियमित घंटागाडीमुळे आरोग्याचा प्रश्नही बिकट झाल्याची तक्रार पाथर्डी गावठाण आणि मधुकर कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित या प्रकरणी लक्ष घातले. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केल्याने पाथर्डीकरांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही आठ ते दहा दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने पाथर्डी गावठाण आणि मधुकर कॉलनी परिसरातील महिलावर्गाच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यांनी शिवसेना महानगरप्रमुखांना याबाबत कळविले होते. त्यानंतर बडगुजरांनी तातडीने पाथर्डी परिसरात भेट देत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पर्यायी व्यवस्थाच नसल्याने या भागातून स्थलांतर केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही, अशा तीव्र भावनाही गृहिणींनी बोलून दाखविल्या. त्यानंतर बडगुजर यांनी तक्रारीची दखल घेत त्वरित संबंधित अधिकारी वर्गाला बोलावले व त्यांच्यासमवेत परिसराचा फेरफटका मारून वस्तुस्थिती जाणून घेतली. अधिकार्‍यांनी तातडीने येथील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाळकृष्ण शिरसाट, श्रुती नाईक, शारदा दोंदे, भारती पाईकराव, सिद्धार्थ दोंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button