Akshaya Tritiya 2024 | अक्षय्य तृतीया मुहूर्त शुभ का मानला जातो?; जाणून घ्या या व्रताची कथा | पुढारी

Akshaya Tritiya 2024 | अक्षय्य तृतीया मुहूर्त शुभ का मानला जातो?; जाणून घ्या या व्रताची कथा

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya 2024) एक शुभमुहूर्त मानला जातो. शुक्रवारी १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. म्हणून वैशाख शुक्ल ३ यांचे हे नाव आहे. हे नाव पडण्याचे कारण मदनरत्न या ग्रंथांत पुढीलप्रमाणे दिले आहे.

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै –
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।।

याचा अर्थ असा की (श्रीकृष्ण म्हणतात) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून याला मुनींनी अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.

या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा कृतयुगाचा (काहींच्या मते त्रेताचा) प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.

‘या’ दिवसाचा विधी असा करावा?

पवित्रजलांत स्नान, विष्णूची पूजा, जप, होम, दान व पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे व ते जमत नसेल तर निदान तिलतर्पण तरी करावे असे सांगितले आहे. या दिवशी सामान्न (शिध्यासह) उदकुंभही द्यायचा असतो. याशिवाय उन्हापासून संरक्षण करणारी छत्री, जोडा, इ. वस्तूही दान द्यायच्या असतात.

‘या’ व्रताची कथा अशी

एक व्यापारी होता. तो नित्य दानधर्म करी व संत- महात्म्यांच्या कथा आवडीने ऐके. कालांतराने त्याला दारिद्र्य आले. पुढे एकदा त्याने असे ऐकले, की बुधवारी रोहिणीयुक्त तृतीया आल्यास त्या दिवशी केलेले दान-पुण्य अक्षय्य होते. मग तसा दिवस येतांच त्याने ते सगळे केले. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठमोठे यज्ञ केले. अनेक प्रकारचे वैभवही भोगले. पण तरीही त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही. (भविष्योत्तर पुराण)

याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला. म्हणून या तिथीस प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्याला अर्ध्य देतात. स्त्रियांना हा दिवस महत्त्वाचा असतो. त्यांना चैत्रांत बसविलेल्या चैत्रागौरीचे त्या दिवशी विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूंही करतात.

ऋषभदेव याने एक वर्ष आणि काही दिवस एवढ्या कालानंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्या घरी या तिथीस उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यामुळे राजाची भोजनशाला अक्षय्य झाली. म्हणून या तिथीस अक्षय्य तृतीया असे नाव पडले.

संदर्भ- भारतीय संस्कृतीकोश, प्रथम खंड

हे ही वाचा :

 

Back to top button