पुढारी ऑनलाइन डेस्क – छगन भुजबळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर वादाची ठिणगी पडली आहे. मात्र, भुजबळांकडून कांदे यांचे आरोप फेटाळण्यात आले आहे.
सुहास कांदे हे आमचे विरोधक आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. दिंडोरीत कांद्याच्या प्रश्नावरुन आधीच भारती पवार यांच्यावर लोक नाराज आहेत. त्यात आणखी अशाप्रकारे कांदे करत असलेल्या आरोपांमुळे 2 कांद्यांचा त्रास भारती ताईंना व्हायला नको अशी सूचक प्रतिक्रीया भुजबळ यांनी दिली आहे. सुहास कांदेंनी त्यांचे काम करावे आम्ही आमचे काम करतो आहे. आमच्या निष्ठेवर त्यांनी सर्टिफिकेट देऊ नये असेही भुजबळांनी खडसावले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे व महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्यात लढत होणार असून दोनही पक्षांकडून प्रचार सुरु आहे. मात्र, भुजबळांचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करायचा सोडून भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. भुजबळांना मंत्री पद महायुतीमुळे मिळालं आहे,पण त्यांना तुतारीचा इतकाच पुळका असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन खुशाल तुतारीचा प्रचार करावा अशी टीका सुहास कांदे यांनी केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नांदगाव येथे निवासस्थानी झालेल्या एका मेळाव्यात आ. कांदे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा आरोप आ. कांदे यांनी केला आहे. तुतारीचा प्रचार करतानाचे राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावाही कांदे यांनी केला आहे. यावर भुजबळांनी हे सर्व आरोप फेटाळत कुणी काहीही आरोप करत असले तरी कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा असे आवाहन केले आहे.
हेही वाचा –