कारखाना चालवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही, रस असेल तरच पुढे या : अजित पवार | पुढारी

कारखाना चालवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही, रस असेल तरच पुढे या : अजित पवार

सिडको : पुढारी वृत्तसेवा
राज्य सहकारी बँक 12 सहकारी साखर कारखाने चालविण्यास देणार आहे. कारखाना चालवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. कारखाने चालवण्यात खरोखरच रस असेल, त्यांनीच पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अंबड-पाथर्डी शाखेच्या उदघ्ाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिलीप दातीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. देशपातळीवर सहकार खाते स्थापन झाले आहे. राज्यकर्त्यांना सहकारात बदल करण्याचा अधिकार आहे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांना उभे करण्याचे काम सहकारातून व्हावे. जातपात, राजकारण बाजूला ठेवूनच सहकारात काम करावे. कर्ज मंजूर करताना वशिल्याऐवजी पात्रता बघावी. सहकारातील अपप्रवृत्तीवर टीका करताना ते म्हणाले की, कधी कधी संस्थेला अडचणीतून बाहेर कढण्यासाठी राज्यकर्ते नियमबाह्य कामे करतात. साखर कारखान्यांना हमी देण्याचे सरकारने बंद केले आहे. मूळात हमी देण्याची वेळच आणू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा. अडचणींवर स्वतःच मात करा. राज्य सहकारी बँक 12 सहकारी साखर कारखाने चालवण्यास देणार आहे. कारखाना चालवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. सहकार क्षेत्रात यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी चांगली कामे केली. त्याचा आदर्श नव्या पिढीने ठेवावा. अडचणींवर मात करण्याची ताकद सहकार चळवळीत व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 1961 साली संस्थापकांनी मोठ्या कष्टाने नाशिकरोड व्यापारी बँक सुरू केली. दत्ता गायकवाड म्हणाले की, गरिबांना पायावर उभे राहण्यासाठी या बँकेची स्थापना झाली. पारदर्शी काम करून आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला. निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, अंबड-पाथर्डी शाखेचा व्यवसाय 25 कोटींचा आहे. बँकेच्या 27 शाखा असून, त्यापैकी स्वमालकीच्या जागेत ही 15 वी शाखा आहे. प्रशांत कापसे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button