‘पीएम मोदींच्या वक्तव्याने अमित शहा घाबरलेत’, अदानी-अंबानी मुद्द्यावरुन काँग्रेसचा भाजपला टोला | पुढारी

‘पीएम मोदींच्या वक्तव्याने अमित शहा घाबरलेत’, अदानी-अंबानी मुद्द्यावरुन काँग्रेसचा भाजपला टोला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदानी-अंबानी, काळापैसा, भ्रष्टाचार याविषयी बोलावे लागत असल्याची टीका काँग्रेसने केली. तसेच पंतप्रधानांच्या वक्तव्याने अमित शाहही घाबरलेत, असा टोलाही काँग्रेसने लगावत अदानी-अंबानी मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. १० वर्षे भ्रष्टाचारात बुडाल्यानंतर नरेंद्र मोदींनी काल धाडस दाखवत भ्रष्टाचारावर मोठा खुलासा केल्याचा खोचक टोलाही काँग्रेसने लगावला.

देशात लोकसभा निवडणूकीचे ३ टप्पे संपल्यानंतर, चौथ्या टप्प्यातील प्रचाराने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे वळण घेतले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमी पंतप्रधान मोदींवर अदानी-अंबानीचे मित्र म्हणून टीका करत असतात. परंतू निवडणूकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राहुल गांधीवर अदानी-अंबानीवरुन टीका केली. त्यामुळे पंतप्रधानांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी काल जोरदार पलटवार केला होता, त्या पाठोपाठ आज काँग्रेसनेही याच मुद्द्यावरून पुन्हा मोदींना घेरले.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांनी गुरुवारी (दि. ९) दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया श्रीणेत म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा पराभव पाहता भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या देशाचे पंतप्रधान इतके दुबळे यापूर्वी कधीच नव्हते. १० वर्षे भ्रष्टाचारात बुडाल्यानंतर नरेंद्र मोदींनी काल धाडस दाखवत भ्रष्टाचारावर मोठा खुलासा केला. राहुल गांधींना पाहून नरेंद्र मोदींना ही हिंमत आली आहे,’ असा टोलाही श्रीणेत यांनी लगावला.

पंतप्रधानांच्या वक्तव्याने अमित शहा घाबरलेत : काँग्रेस

सुप्रिया श्रीणेत पंतप्रधानांवर आरोप करताना म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा केल्याने संपूर्ण भाजप आणि सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपचे लोक घाबरले आहेत कारण त्यांना माहित आहे की पंतप्रधान मोदी पराभव पाहून अदानी-अंबानीविषयी बोलू शकतात, तेव्हा आपण काय आहोत? सरकारमध्ये अमित शहा सर्वाधिक घाबरले आहेत. शिवाय जे सरकारी अधिकारी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार काम करत होते तेही घाबरले आहेत.’

Back to top button