धुळे : राज ठाकरेंच्या विधानाने विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष इमरान शेख यांचा राजीनामा | पुढारी

धुळे : राज ठाकरेंच्या विधानाने विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष इमरान शेख यांचा राजीनामा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद धुळ्यामध्ये दिसून आले. या विधानाने नाराज होऊन मनसे विद्यार्थी आघाडीच्या शहर उपाध्यक्ष इमरान शेख यांनी राजीनामा दिला आहे.

मनसेचे धुळे शहर विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष इमरान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी यांच्याकडे सोपवला. यासंदर्भात भूमिका मांडताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे संदर्भात केलेल्या विधानाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाजवण्याचे विधान केल्यामुळे मुंबई तसेच राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हा प्रकार घडला असल्याचे इमरान शेख म्‍हणाले. अशाप्रकारे विधान केल्यामुळे मनसेचे काम करीत असताना धुळे शहरातील अल्पसंख्यांक समाजातील लोकांकडून या विधानाबाबत विचारणा होत आहे.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, तसेच, अशा प्रकारच्या कृत्यामुळे शहराचे सामंजस्याचे वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे आपण जनतेची कामे अन्य पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान धुळ्यातून मुस्लिम समाजाकडून हा पहिलाच राजीनामा आहे. असे ते म्‍हणाले.

हेही वाचा 

Back to top button