मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महाराष्ट्रसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली. त्याचबरोबर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, आज जे घडले ते व्हायला नको होते. राजकारणात विविध घडामोडी या होत असतात. तसेच आरोप प्रत्यारोप ही होतच असतात. परंतु कोणाच्या घरावर जावून दगड फेक करणे ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. तर आज शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्रसाठी काळा दिवस आहे.
दरम्यान, आंदोलनावेळी 82 वर्षांचे पवार साहेब, त्यांची 75 वर्षांची पत्नी आणि नात असे तिघेजण घरामध्ये असताना हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये काही वाईट घडले असते तर असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता महाराष्ट्रतील राजकीय घडामोंडीतील सोनेरी झालर कोणीही बिघडवू नये. त्यांचे परिणाम चांगले नसतील.
तसेच, शरद पवार यांनी आतापर्यंत 50 वर्षांत एस टीच्या अधिवेशनात त्यांनी 49 वेळा तरी त्यांनी अध्यक्षपद तर त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदृाटन करण्यात आले आहे. यावरून स्पष्ट दिसून येते की शरद पवार हे कधीही एस टी विरोधात नव्हते.
तर राष्ट्रवादीकडून सर्वजणांनी शांत रहावे, असे आवाहन शदर पवारांनी केले आहे. आणि आम्ही सर्वजन या आंदोलनाचा निषेध करतो. असे आव्हाड म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी तयारी दर्शवली आहे. सुळे म्हणाल्या की, "मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते. कारण, माझ्या घरावर अचानक हल्ला झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. मी हात जोडून सर्वांना विनम्रपणे विनंती आहे की, माझी आणि आमच्या नेत्यांची चर्चेला तयार आहे. जी काही चर्चा करायची आहे, ती शांततेच्या मार्गाने व्हावी, इतकीच अपेक्षा आहे."
"माझ्या घरावर अचानक झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. माझ्या घरातील लोकांना पहिल्यांदा सावरावं लागेल. जर प्रश्न सोडवायचे असतील, तर शांततेच विचार आणि चर्चा करून सोडवावे लागलीत. असे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली.
दरम्यान, झाल्या प्रकारानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा असल्याचे म्हणाले. अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी सर्व चर्चा केल्या आहेत, न्यायालयानेही निर्णय दिला आहे. असे असतानाही पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, महाविकास आघाडी सरकार डोळ्यात खुपत असल्याचेही ते म्हणाले.