नाशिक : दाजीबा वीरासह मंडळांवरील गुन्हे मागे घेण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन | पुढारी

नाशिक : दाजीबा वीरासह मंडळांवरील गुन्हे मागे घेण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथील दाजीबा वीर व रंगपंचमी उत्सव साजरा केला म्हणून विविध मित्रमंडळांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. या मागणीसंदर्भात संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

नाशिक येथे होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड साजरी केली जाते. त्यात देवीदेवतांचे तसेच वीरांचे स्मरण व्हावे, यासाठी शेकडो नागरिक सहभागी होत असतात. वाजत-गाजत पाचपावली करत लोक गोदावरी नदीत आपल्या देवदेवतांना स्नान घालतात. वीर नाचविण्याची ही परंपरा अतिप्राचीन असून, दाजीबा महाराजांचा वीर हे यातील प्रमुख आकर्षण असते. या वीराच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मागील वर्षी व यावर्षीदेखील दाजीबा महाराजांच्या वीराचा मान असणार्‍या विनोद बेलगावकर यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच नाशिक येथे महत्त्वाच्या मित्रमंडळांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले.

आमदार देवयानी फरांदे यांनी या गुन्ह्यांची दखल घेत अशा प्रकाराने शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात सण साजरे होत असताना नागरिकांवर गुन्हे नोंदविणे हे गैर असल्याची बाब ना. दिलीप वळसे-पाटील यांच्या निदर्शनास आणून देत गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी केली.

अधिवेशन झाल्यानंतर पोलिस आयुक्तांशी चर्चा करून दाजीबा वीर व रंगपंचमी उत्सवातील मंडळांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देऊ, असे असे आश्वासन ना. वळसे- पाटील यांनी दिले.

हेही वाचा :

Back to top button