गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, बच्चू कडू यांचा नवा गौप्यस्फोट | पुढारी

गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, बच्चू कडू यांचा नवा गौप्यस्फोट

अमरावती, पुढारी वृत्तसेवा गुवाहाटी दौऱ्यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. मी उद्धव ठाकरे यांना गुवाहाटीला जाण्यापूर्वी फोन केला होता. मात्र त्यांची तेव्हा बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी माझा फोन उचलला. मात्र, माझ्याशी ते फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला, असा गौप्यस्फोट आमदार कडू यांनी केला आहे. आमचे घराचे भांडण नाही तर राजकीय आहे, असे देखील आमदार कडू म्हणाले.

बच्चू कडू शनिवारी (दि.२५) अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. गुवाहाटी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. शिवसेनेत फुट देखील पडली होती. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते.

राजकारण जनतेने मनावर घेऊ नये

पाच वर्षातील राजकारण पाहिले तर एक कॉमन गोष्ट दिसून येते. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सर्वांच्या बॅनरवर आहे. काँग्रेसच्या आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेब होते. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, भाऊ नसतो, सगा सोयरा नसतो. राजकारण ही जनतेने फार मनावर घ्यायची गोष्ट नाही. जनतेने केवळ मतदानाच्या वेळेस मनावर घेतलं पाहिजे. कोण कुठे बसलं, याच्यापेक्षा कोण आपल्यासाठी काय करतं हे लक्षात घेणे आवश्यक आहे. नेमकं जनता तेच विसरते, असे भाष्य देखील त्यांनी राजकारणावर केले.

नवनीत राणांचा पराभव रवी राणांमुळे होणार

सट्टा बाजारात कोणाचाही भाव असला तरी अमरावती लोकसभेचा निकाल प्रहारच्याच बाजूने लागेल. ही निवडणूक केवळ आम्ही राणा यांच्यामुळेच लढविली असे नाही तर चार-पाच मुद्दे घेऊन आम्ही मैदानात होतो. आम्ही शेतकरी सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन निवडणूक लढत होतो. आम्हाला प्रहारची ताकद काय आहे हे दाखवायचे होते, असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान नवनीत राणांच्या पराभवाला रवी राणा कारणीभूत ठरतील. रवी राणा किमान दोन वर्ष गप्प बसले असते तर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button