

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहर व परिसरामध्ये अनेक ठिकाणी फिरस्ती कुटुंबे दिसून येतात. अशाच एका कुटुंबातील चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून फिरस्त्या कुटुंबांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचा लोंढा येत असतो. त्यांच्या रोजीरोटीचाच पत्ता नसल्याने डोक्यावर निवार्याचे छप्पर ही तर दूरची गोष्ट असते. दोनवेळच्या जेवणासाठी मिळेल ते काम करून जागा मिळेल तिथेच वास्तव्य अशी या फिरस्त्यांची दैनंदिनी असते. सातारा शहर व परिसरातही अनेक ठिकाणी फिरस्ती कुटुंबे दिसून येतात. अशाच एका कुटुंबातील चिमुरडीचे चार दिवसांपूर्वी अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. मन सुन्न करणार्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मानवतेला काळिमा फासणार्या अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. मुलांच्या काळजीने पालकांची झोप उडत आहे. वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे समाजमनही स्तब्ध झाले आहे.
अशा घटनांमध्ये बालकल्याण समितीची भूमिका महत्वाची आहे. त्या-त्या जिल्ह्यामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असणार्या बालकांची चौकशी करणे, पालकांचा शोध घेणं, गरजेनुसार त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी तसेच रस्त्यावर सापडलेल्या बालकांच्या पालकांचा शोध न लागल्यास व त्यागपत्राने बालके सुपूर्त झाल्यास दत्तकसाठी विधीमुक्त करण्याचं महत्वपूर्ण काम बालकल्याण समिती करते. या समितीची नियुक्ती राज्यशासनाकडून जिल्हास्तरावर केली जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील बालकल्याण समितीवरील सदस्यांची नियुक्ती मागील वर्षांपासून रखडली आहे. त्याचा फटका पिडीत बालकांना बसत आहे.
प्रत्येक जिल्ह्यात राज्यशासना-कडून एक समिती गठित करुन बालकल्याण समितीवर बालकांचे हक्क व संरक्षण क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींची निवड केली जाते. त्यामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य असतात. या समितीची प्रत्येक महिन्याला बैठक होणे गरजेचे असते. सातारा जिल्ह्यातील बालकल्याण समितीवर नवीन सदस्यांच्या नियुक्त्याच न झाल्याने सांगलीच्या बालकल्याण समितीचा टेकू घेतला जात आहे. पीडीत बालकांविषयी प्रश्न सोडवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून जिल्हा बाल कल्याण समितीला वाली मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अत्याचारित बालिकेच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी गृहराज्य मंत्र्यांच्या घरासमोर धिंगाणा घातला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेने रस्त्यावर फिरणारी, कोणतातरी आडोसा घेऊन ऊन-पावसात राहणारी कुटुंबे व त्यातील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जिल्हाधिकारी व शासनाने इथून पुढे अशा घटना सातार्यात घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
– सुनिशा शहा, अध्यक्षा, नारी शक्ती फाऊंडेशन