सांगली : मराठा-ओबीसींत भांडणे लावण्याचा प्रयत्न : वडेट्टीवार | पुढारी

सांगली : मराठा-ओबीसींत भांडणे लावण्याचा प्रयत्न : वडेट्टीवार

सांगली : पुढारी वृत्तसेवा

ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत मराठ्यांना ओबीसींतून नको तर स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे, असे प्रतिपादन ओबीसी नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ देणार नसल्याचेही ते म्हणाले.

ओबीसी, व्हीजेएनटी, बहुजन परिषदेतर्फे सांगलीत शनिवारी स्टेशन चौकात ओबीसी समाजाचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, मंडल आयोगाला विरोध केल्याच्या चुकीची शिक्षा आता ओबीसींना भोगावी लागत आहे. त्यावेळी आयोगाचे समर्थन केले असते तर आज ही वेळ आली नसती.

ओबीसी समाज एक होत नसल्याचा गैरफायदा काहींजण घेत आहेत. परंतु आता ओबीसींनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. ओबीसी एकत्र आला तर त्यांची सत्ता येऊ शकते. प्रस्थापित समाज आपणास कधीही वर येऊ देणार नाही, त्यामुळे आता ओबीसींनी एकसंघ होऊन राजकीय आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हावे. ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक होऊ देणार नाही.

मराठा समाजातील काही जणांना आमदारकी, खासदारकी मिळविण्यासाठी व टिकवण्यासाठी आरक्षणाचे आंदोलन करावे लागत आहे. ओबीसी समाज मराठ्यांच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करून दोन्ही समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. खरे तर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी आमची इच्छा आहे, पण ते ओबीसींतून नको. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे नेऊन मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींची अजिबात हरकत नाही.

यावेळी कल्याण दळे, शब्बीर अन्सारी यांचीही भाषणे झाली. संघटनेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले. मेळाव्यास रामराव वडकुते, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय विभुते, सुशिला मोराळे, मोहन मदने, दत्तात्रय घाडगे, अमर निंबाळकर, प्रदीप वाले, डॉ. विवेक गुरव, सुनील गुरव, मनोज सरगर, हरिदास लेंगरे, अमर निंबाळकर, प्रा. लक्ष्मण हाके, शशिकांत गायकवाड यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

प्रस्थापित समाजातील नेत्यांचा मेळाव्यास विरोध

प्रस्थापित समाजातील नेत्यांनी या मेळाव्यास विरोध केल्याचा आरोप यावेळी अनेक वक्त्यांनी केला. काही नेत्यांनी मेळावा होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी धमक्या दिल्या. काही बड्या नेत्यांनी वडेट्टीवार यांना ‘तुम्हाला ओबीसी नेते होण्याची घाई झाली आहे, जरा जपून राहा,’ असे सांगितले. पण या विरोधाला ओबीसी समाज पुरून उरला. मेळाव्याची गर्दी पाहता प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Back to top button