खंडीत केलेल्या कृषी वीज जोडण्या पूर्ववत करणार; सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा | पुढारी

खंडीत केलेल्या कृषी वीज जोडण्या पूर्ववत करणार; सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा

धुळे पुढारी वृत्तसेवा ; शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी तातडीने थांबविण्यात यावी यासाठी आ. कुणाल पाटील यांच्यासह आमदारांनी विधानभवनात मागणी केली होती. या मागणीला यश आले असून याबाबतचा निर्णय घेत तसा आदेश उर्जा मंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान खंडीत केलेला कृषीपंपांची वीज जोडणी पूर्ववत करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे जिल्हयातील आणि राज्यातील शेतकर्‍यांचे विजेचे प्रश्‍न तसेच विजबील अभावी वीज तोडणी थांबविण्याची मागणी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेनशनात केली होती. नियम क्र. 105 अन्वये उर्जा विभागाकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लक्षवेधी मांडतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले होते की, धुळे जिल्हयासह राज्यातील शेतकरी रडकुंडीला आला आहे. आज रब्बीचे पिक जे डोळ्यासमोर दिसत आहे, परंतु उर्जा विभागाकडून कृषीपंपाचा विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने रब्बीचे हे पिक हातातून जाते की काय? अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. येणार्‍या काळात महाराष्ट्रात कृषीपंपाची विजबिल भरायला पैसे नाही आणि हातातोडांशी आलेले पिक करपून गेले.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारू शकत नाही. मागील अधिवेशनात शेतकर्‍यांचे विज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही असे आश्‍वासन आपण दिले होते. मात्र आजही शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची विज तोडणी केली जात आहे हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे. अनेक शेतकर्‍यांनी काही महिन्यापूर्वी विजबिलाचे पैसे भरले होते त्यांचेही विज कनेक्शन खंडीत केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची विज तोडणी थांबविण्याचे तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी पाटील यांच्यासह आमदारांनी अधिवेशनातील भाषणात केली होती.

या मागणीचे विधानसभेत मुख्यमंत्र्यांसही, उपमुुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी दखल घेतली. विधानभवनात आपल्या निवेदनात आ. कुणाल पाटील यांच्या मागणीचा उल्लेख करीत उर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांनी शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने शेतकर्‍यांच्या हातात पुढील पिक येईपर्यंत कृषीपंपाची विज तोडणी करु नये तसेच खंडीत केलेला कृषीपंपाचा विज पुरवठा पूर्ववत करण्याची घोषणा करीत निर्णय घेतला. त्यामुळे आ. कुणाल पाटील यांनी अधिवनेशनाच्या सुरुवातीलाच मांडलेल्या शेतकर्‍यांच्या मागणीला यश आले असून शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

दिवसा वीज पुरवठ्यासाठी समिती-
कृषी पंपांना भारनियमन करीत असतांना दिवस-रात्र अशा विविध वेळेत ते केले जाते. त्यामुळे रात्री विज असतांना शेतकर्‍यांना पिकाला पाणी देतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवसा विज पुरवठा करण्याची मागणी वारंवार होत असते. त्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अहवालानुसार निर्णय घेण्यात येईल असे उर्जा मंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती आ. कुणाल पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button